लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळामार्फत ज्ञानविज्ञान वाचन चळवळ सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत ९२ ग्रंथ अन्वेषकांची निवड करण्यात आली असून ते पुणे, नगर व नाशिक जिल्हयातील केंद्रामध्ये वाचन चळवळ रूजविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.बहि:शाल विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या वाचन चळवळीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी विद्यापीठामध्ये तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. निवडक ग्रंथातील आशयाचे विश्लेषण करणारी मांडणी करणे आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचे काम या कार्यकर्त्यांकडून केले जाणार आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांना ग्रंथ अन्वेषक म्हणून संबोधले जाणार आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांना बहि:शाल शिक्षण मंडळाने पुरवलेल्या ग्रंथाच्या यादीतील एका ग्रंथाची निवड करून त्याबाबतचे सादरीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या १२० जणांनी प्रत्येक एक याप्रमाणे १२० ग्रंथ निवडून चळवळीत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली होती. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार त्यापैकी ९३ ग्रंथ अन्वेषकांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे यांनी दिली. पुणे, नगर, नाशिक या जिल्हयातील महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक वाचनालये, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडळे इत्यादींच्या माध्यमातून ग्रंथावर चर्चा घडवून आणणे हा या वाचन चळवळीचा मुख्य उदद्ेश आहे. बहि:शाल शिक्षण मंडळाच्या केंद्रावर तीन दिवस एका गं्रथावर एक तास व्याख्यान आणि चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ग्रंथ अन्वेषकांच्या या कार्यक्रमातून विद्यार्थी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढविण्याचे काम केले जाणार आहे.
विद्यापीठाकडून वाचन चळवळ
By admin | Published: June 27, 2017 7:31 AM