जुन्नर : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील शिवाई, मेणा आणि कुलूप, प्रवेशद्वारांचे दरवाजे पुरातत्त्व विभागाच्या वतीने नव्याने बसविण्यात येत आहेत. महाकाय, दर्जेदार टिकाऊ सागाच्या लाकडातून ऐतिहासिक धाटणीचे हे दरवाजे कुशल कारागिरांनी बनविले आहेत. त्यामुळे शिवकालीन दुर्गबांधणीचे ‘मॉडेल फोर्ट’ म्हणून आकारास येत असलेल्या किल्ले शिवनेरीचे भव्य बुरुजयुक्त बुलंद दरवाजे शिवप्रेमी, दुर्गप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून किल्ले शिवनेरी संवर्धनाची कामे मागील १० वर्षांपासून सुरू आहेत. शिवनेरीच्या प्रवेशमार्गावरऐकून सात भव्य बुरुजयुक्त प्रवेशद्वार (वेशी) आहेत. घडीव, दगडी चिरेबंदी बांधणीतील या प्रवेशद्वारापैकी फक्त हत्ती प्रवेशद्वाराचा महाकाय दरवाजा ऊन-पावसाला तोंड देत चांगल्या अवस्थेत उभा होता. इतर सहा प्रवेशद्वारांचे लाकडी दरवाजे नामशेष झाले होते. हे दरवाजे पुन्हा नव्या दिमाखात उभे करण्याची संकल्पना पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आली.चार वर्षांपूर्वी गडावरील पहिला महादरवाजा, तर दुसऱ्या परवानगी प्रवेशद्वाराला नवीन सागवानी दरवाजे बसविण्यात आले होते. आता शिवाई मंदिराकडे जाणारा शिवाई दरवाजा, गडावर जाणारा मेणा दरवाजा आणि कुलूप दरवाजा या तीन प्रवेशद्वारांवर महाकाय असे सागवानी दरवाजे बसविण्यात आले आहेत. हे दरवाजे तयार करण्यासाठी लागणारे उत्तम प्रतीचे जुने सागवानी लाकूड विदर्भातील बल्लारशा येथील वनविभागाच्या डेपोतून उपलब्ध करून देण्यात आले होते. लेण्याद्री येथे पुरातत्त्व विभागाच्या गोदामात हे दरवाजे तयार करण्यात आले. दरवाजे प्रवेशद्वारांवर लावण्यात आल्यानंतर त्यावर लोखंडी कड्या, तसेच पारंपरिक पद्धतीचा लोखंडी साज, हत्तींना दरवाजाला धडका देता येऊ नयेत, म्हणून दरवाजावर बसविले जायचे लोखंडी खिळे बसविण्याचे काम आता सुरू आहे.>गडाची सुरक्षा राहणार अबाधीतशिवनेरीवरील या सर्वात मोठ्या व चांगल्या अवस्थेत असलेल्या अंबारखाना इमारतीच्या कमानीचादेखील महाकाय दरवाजा बसविण्यात आला आहे. तसेच या इमारतीच्या खिडक्यांना लाकडी चौकटी व जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. या इमारतीतील शस्त्रास्त्र संग्रहालय आणि अॅम्फीथिएटर उभारण्याचे शासनाचे नियोजन आहे. परंतु या वास्तूचे संरक्षण आणि मजबुतीकरणाचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे.किल्ले शिवनेरी राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. ती वास्तू पुरेशी संरक्षित असावी, प्रवेशद्वारांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त व्हावे, या हेतूने बसविण्यात आलेल्या दरवाजांमुळे गडाची सुरक्षादेखील अबाधित राहण्यास मदत होणार आहे.गडावरील शिवाई प्रवेशद्वाराची बांधणी अलीकडील पेशवेकाळात झालेली आहे, तर गडवाटेवरील सात दरवाजांच्या मालिकेतील सर्वच दरवाजांची बांधणी एकाच कालखंडात केलेली नसून वेगवेगळ्या राजवटी गडावर नांदत असताना झाली असल्याचे बांधकामाच्या शैलीवरून स्पष्ट होते.
किल्ले शिवनेरीवरील बुलंद दरवाजे सज्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:55 AM