पुणे : गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या मिनी आॅलिम्पिक स्पर्धा काही अडचणींमुळे होवू शकली नाही. आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत लवकर १५ खेळांची मिनी आॅलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे (एमओए) सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकारांना सांगितले. या वेळी पुढील ४ वर्षांसाठी बिनविरोध निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी बी. डी. कदम यांनी केली. या वेळी भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे प्रतिनिधी म्हणून व्हॉलीबॉलचे के. मुरुगन उपस्थित होते. निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर लांडगे बोलत होते. ते म्हणाले, या स्पर्धेसाठी विविध उद्योगसमूहांशी आमचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यासंबंधात चर्चा करतील. यानिमित्ताने एमओएची आर्थिक बाजूसुद्धा भक्कम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी सुद्धा एक वेगळी समिती स्थापन करण्यात येणार आहे. एमओएच्या विविध कामांसाठी वेगवेगळ्या समितींची स्थापन लवकरच करण्यात येणार आहे. एमओएच्या वतीने राज्यातील विविध क्रीडा संघटनांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एमओएला संलग्न असलेल्या सर्व क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात संघटनांच्या समस्य समजून घेऊन त्या-त्या समस्यांच्या विषयानुसार त्या-त्या समित्यांवर (ज्या एमओएने नियुक्त केल्या आहेत) समस्या निवारण करण्याची जबाबदारी सोपविण्यात येईल.’’यावेळी अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व राज्यसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, एकमेकांमधील वाद संपुष्टात आणून राज्यातील खेळाडूंसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण देवून त्यांना चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करणे आणि आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडा. काही क्रीडा संघटनांच्या वादाबाबत विचारले असता लांडगे म्हणाले, ‘‘भारतीय आॅलिम्पिक संघटना आणि त्या-त्या खेळांची राष्ट्रीय संघटन यांची मान्यता असलेल्या राज्य संघटनांना एमओएची मान्यता देण्यात येते. एमओएचे अध्यक्ष अजित पवार, मी स्वत: व काही वरिष्ठ पदधिकारी लवकरच मुख्यमंत्र्यांची आणि क्रीडामंत्र्यांची वेळ घेऊन त्याच्यासमोर वरील सर्व प्रस्ताव मांडणार आहोत. ’’ (क्रीडा प्रतिनिधी) क्रीडा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर एमओएचे पदाधिकारी लवकरच भेट घेऊन मिनी आॅलिम्पिक स्पर्धा १५ खेळांसाठी आयोजित करण्याबाबत चर्चा करतील. दर २ वर्षांनंतर ही स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन असेल. जर शासनाकडून काही तांत्रिक अडचणी असल्यास एमओए ही स्पर्धा स्वबळावर आयोजित करेल. - बाळासाहेब लांडगे
मिनी आॅलिम्पिक स्पर्धेसाठी तयार
By admin | Published: March 26, 2017 12:48 AM