पुणे : लॉकडाऊनमुळे मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस तसेच अन्य मार्गांवरील लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या गाड्या सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाची पुर्ण तयारी आहे. मात्र, राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्यामध्ये एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली आहे. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये गुरूवारपासून पीएमपीची बससेवाही सुरू झाली आहे. तसेच राज्य शासनाने सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना राज्यातील सर्व थांबे घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना सध्या सुरू असलेल्या गाड्यांमधून आंतरजिल्हा प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र, दुसरीकडे राज्यांतील विविध शहरांना जोडणाºया एक्सप्रेस, लोकल व पॅसेंजर गाड्यांना राज्य शासनाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.लॉकडाऊनपुर्वी पुणे व मुंबईदरम्यान दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करत होते. पण गाड्या बंद असल्याने बहुतेकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी सेवा सुरू झाली असली तरी या गाड्यांच्या वेळा आणि तिकीट दरही परवडणारा नाही. त्यामुळे किमान सकाळी व सायंकाळी एक एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे. आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवडलगतच्या परिसरातून दोन्ही शहरांमध्ये येणाºया कामगारांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यांच्यासाठी पुणे-लोणावळा लोकल, पुणे-दौंड डेमु सेवा सुरू करण्याची मागणीही होत आहे. रेल्वे प्रशासनाची या गाड्या सुरू करण्याची तयारी आहे. पुणे राज्य शासनाने अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही.----------------पुणे-मुंबई किंवा इतर मार्गांवर गाड्या सुरू करण्याची आमची पुर्ण तयारी आहे. पण हे राज्य शासनावर अवलंबून आहे. त्यांच्याकडून मागणी केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन निर्णय घेईल.- रेणु शर्मा, पुणे विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे-----------------मागील तीन महिन्यांपासून १४ ते १५ जण पुणे-मुबंईदरम्यान खासगी बसने ये-जा करत आहोत. दररोज ७०० रुपये मोजावे लागतात. खुप गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने सकाळी आणि सायंकाळी किमान एक रेल्वेगाडी सुरू करणे आवश्यक आहे.- अंकिता देशपांडे, प्रवासी