पुणे : कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय बनावटीची ‘पिनाका मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीम’ जवळपास ८० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करून त्याचा वेध घेण्यास सक्षम होणार आहे. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट तर्फे (एआरडीए) गायडेड पिनाकाचे नवे डिझाईन तयार करण्यात आले आहे. याची पहिली चाचणी यशस्वी झाली असून, लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता असणारी चाचणी महिन्यात पोखरण येथे करण्यात येणार असल्याची माहिती एआरडीएचे संचालक डॉ. के. एम. राजन यांनी शुक्रवारी ( दि.२४आॅगस्ट) पत्रकार परिषदेत दिली. डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा असलेली पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटला १ सप्टेंबरला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राजन म्हणाले, ‘‘भारताला शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीबरोबर आधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती एआरडीए तर्फे करण्यात आली आहे. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्ससाठी अनेक शस्त्रास्त्रे आतापर्यंत बनविण्यात आली आहेत. यात अनेक बॉम्ब, भूसुरंग आणि पाणतीराबरोबर वैमानिकांना बाहेर पडण्यासाठी एअर इजेक्टिंग सिस्टीम बनविण्यात आली आहे. एकाच वेळी १२ रॉकेट डागण्याची क्षमता असलेल्या पिनाका मल्टी बॅरल रॉकेटची निर्मिती एआरडीए तर्फे करण्यात आली होती. यात अत्याधुनिक बदल करत मार्क १ आणि मार्क २ या नव्या पिनाका प्रणालीची निर्मिती करण्यात आली होती. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या बंकरचा अचूक वेध पिनाकाने घेतला होता. फक्त ४४ सेकंदांत १२ रॉकेट डागण्याची या शस्त्रात क्षमता आहे. या शस्त्राची मारकक्षमता ६० किमी एवढी आहे. मात्र, लष्कराच्या मागणीनुसार यात बदल करण्यात आले असून, त्यांची मारकक्षमता ८० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता एआरडीएच्या शास्त्रज्ञांनी पिनाकामध्ये विकसित केली आहे. याच्या काही चाचण्या आधी झाल्या असून, त्या यशस्वी झाल्या आहेत.
एआरडीएला ६० वर्षे पूर्ण डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा असलेली पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटला १ सप्टेंबरला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रिव्हर्स इंजिनिअरिंग बरोबरच देशी तंत्रज्ञानाचा विकासही करण्यात आला आहे. आॅर्डनन्स फॅक्ट्रीच्या साह्याने या शस्त्रास्त्रांचे उत्पादन देशात सुरू आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवे प्रकल्प हातात घेण्यात येतील असेही डॉ. के. एम. राजन म्हणले.२० लाख रायफल्सची निर्मितीलष्करातील जवानांना अत्याधुनिक शस्त्र मिळावीत या दृष्टिकोनातून ‘इन्सास’ (इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम) रायफल्सची निर्मिती एआरडीईने केली आहे. या रायफल्सचे डिझाईन आणि चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने, त्या अनुषंगाने सैनिकांसोबतच सशस्त्र दल आणि सीमा सुरक्षा दल, पोलीस यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. आजमितीला २० लाख रायफल्स, ६०० कोटींची विस्फोटके आणि एक लाख लाईट मशीन गन उत्पादित करून सुरक्षा दलांना पुरविण्यात आली आहेत. एआरडीईचे शास्त्रज्ञ ९ एमएम कार्बोइनच्या जागी मॉडर्न सबमशीन कार्बोइन ५.५६ एमएम कार्बोइन विकसित करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची निर्मिती करण्यात येत आहे. त्याकरिता डीआरडीओ आणि एआरडीए यांच्या संयुक्त मदतीने पुढील दोन वर्षांत याचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल.