पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा होत आहे. याच दरम्यान त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं असं म्हणत निशाणा साधला आहे. "आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा" असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
"एक खासदार उठतो, मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, टीकाही सहन करायला तयार पण पोरं अडकू देणार नाही" असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच "एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य तरी आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. काही तर असे आहेत, ज्यावर मला बोलताही येणार नाही. महाराष्ट्रातली माझी ताकद हकनाक तिथे अडकली असती. ती मला तिकडे सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं टीकाही सहन करायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही" असं म्हणत टीका केली आहे,
"आत्ता जाग आली? राज ठाकरेंनी माफी मागावी वगैरे? 12-14 वर्षांनी आठवण आली का? तेव्हा ही माणसं कुठे होती? यातून चुकीचे पायंडे पडतायत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणे राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही. विषय माफी मागण्याचाच आहे, तर गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचे सदस्य आहेत. गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिथल्या उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना मारलं, एका रात्रीत 10-15 हजार बिहारी, उत्तर प्रदेशवाल्यांना हाकलून लावण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार आहे?" असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.