काटेवाडी : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी काटेवाडीकर सज्ज झाले आहेत. धोतराच्या पायघड्या अंथरून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे बुधवार (दि.२९) रोजी पालखी सोहळ्यातील पहिले रथाभोवती मेंढ्याचे वैशिष्टपूर्ण रिंगण पार पडणार आहे.
गावच्या वेशीवरून ग्रामस्थ पालखी खांद्यावरून दर्शनमंडपात नेण्यात येते. यावेळी परीट समाज बांधवांच्या वतीने स्वागतासाठी पांढरेशुभ्र धोतराच्या पायघड्या अंथरल्या जातात यासाठी ग्रामस्थ तरुणही मोठ्या संख्येने स्वागतासाठी सहभागी असतो. रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत. सोहळ्यातील वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच सोहळ्याच्या स्वागतासाठी उणीव राहू नये यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार लक्ष ठेवून आहेत यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, वीज वितरण विभाग, सह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर व हा सोहळा पुढील मुक्कामी गेल्यावर ग्रामस्थांच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचे संरपच विद्याधर काटे व उपसरपंच श्रीधर घुले यांनी सांगितले आहे.
पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, परिसरातील विहिरीतील शुद्धीकरण, पालखी सोहळ्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी येथे विसावतो दुपारी रिंगण सोहळा पार पडल्यावर भवानीनगर कडे प्रस्थान होते. तर सायंकाळी सणसर येथे मुकामासाठी विसावतो.