.....................
घर खरेदीदार व विकसकांची कोंढव्याला पसंती
- अभिजित भन्साळी, संचालक, वेलविशर ग्रुप.
एकेकाळी ऐतिहासिक वारशाचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता आधुनिकतेचा साज चढवतेय. पुण्याच्या वाड्यांबरोबरच खुद्द पुण्याच्या वेशीवरच कित्येक जुनी घरे भुईसपाट होऊन तिथे आता उंच इमारती, मोठमोठी गृहसंकुले, मॉल्स होऊ लागलेत.
पुण्याचा चहूबाजूने विकास होत आहे. पूर्वी पेठांपुरतं मर्यादित असणार पुणं आता विस्तारत चाललंय. चारपदरी रस्ते, मेट्रो, आयटी हब, एक्सप्रेस वे यांमुळे सगळी गावं अगदी पुण्याच्या जवळ आली. धानोरीपासून लोणावळ्यापर्यंत, कोंढव्यापासून लोणीपर्यंत सगळंच विकसित होतंय. विविध कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधीही आजूबाजूंच्या परिसरात निर्माण होत आहेत. त्यामुळे पुणे शहराकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. मुंबई, नाशिक, कोकण यामार्गे मुख्य शहरांना जोडणारे सर्व महामार्ग हे तळेगाव, धानोरी, कोंढवा, मुंढवा, हडपसर, खराडी, धायरी, धनकवडी, कात्रज, सोलापूर हायवे, मांजरी, उंड्री या सर्वांना जोडत गेला. त्यामुळे साहजिकच उंच इमारती, आकर्षक सुविधा, जागतिक दर्जाचं बांधकाम त्यामुळे नवश्रीमंत वर्गाचा ओढा या ठिकाणी वाढत आहे.
पुणे शहर हे नि:संशय देशातील सर्वात सुखी व शांतताप्रिय शहरांपैकी एक आणि भारतीय शहरी व निमशहरी जीवनाचा चेहरा आहे. शिक्षण व नोकरीच्या आकर्षणाने या शहरात दररोज हजारो लोक येत असतात, त्यामुळे राहण्याच्या दर्जेदार जागांची निकडही तेवढीच भासते. व्यावसायिक आणि रोजगार संधी यांमुळे लोक या शहराकडे आकर्षित होतात.
गेल्या काही वर्षांत नोकरदारांनी आपला मोर्चा पुण्याच्या कोंढवा परिसराकडे वळविला आहे. शहर आणि गावाकडचीही निसर्गसंपन्नता या दोन्हीचा उत्तम संगम येथे अनुभवता येतो. गेल्या काही वर्षांत उपलब्ध झालेल्या सुविधा, प्राथमिक सुविधांसह पाणी, रस्ते, नवनवीन प्रकल्प, मॉल्स, आरोग्य सुविधा, शैक्षणिक केंद्रे यांमुळे कोंढवा परिसर येथे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या नोकरदारांच्या पसंतीस उतरत आहे. बहुभाषिक चेहरा, शैक्षणिक केंद्रे, सुलभ वाहतूक आणि नागरी सुविधांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलतो आहे. पुणे शहरानजीकचे छोटे गाव, पुरातन मंदिरे, पारंपरिक शेतीउद्योग, बलुतेदार मंडळी, घराघरांत सुतारकाम, माळरान, शिवकालीन वाड्य़ावस्त्या असा कोंढवा गावचा पूर्वापर लौकिक होता.
व्यावसायिक, औद्योगिक भाग असलेला कोंढवा आधुनिकतेचा साज चढवत आहे. तिथे होत असलेले उंच गगनभेदी रेसिडेंन्शियल प्रोजेक्ट्स पाहिल्यावर खुर्द अन् बुद्रुक या दोन सीमांमध्ये विभागलेल्या कोंढव्याचे आजचे रूप चांगल्या बिल्डर्सच्या कामाचे फलित आहे.
हडपसर पुणे सोलापूर हायवेवरील एक थांबा असलेलं हे ठिकाण आज खूप मोठा रेसिडेंन्शियल झोन तयार झालाय. आजूबाजूच्या गावांना जोडणारं महत्त्वाचं ठिकाण म्हणून त्याचा विकास झपाट्यानं होतोय. आजूबाजूच्या परिसरात नोकरी व शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांसाठी हा परिसर एक आयडियल डेस्टिनेशन ठरत आहे. मुंढवा औद्योगिक नगरी, जवळच रेल्वे ट्रॅक, कॉलेज आणि शाळांची रेलचेल व शांत निसर्गरम्य वातावरण हे आजही इथे राहण्यासाठी खुणावत असते. वीजपुरवठा, सर्वंकष गृहनिर्मिती, रोजगारनिर्मिती ई-गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि नियमित पाणीपुरवठा यात हा परिसर उजवा आहे.
कोरोनाने सगळ्यांचं आयुष्य बदललं, सगळी गणितं बदलली. कुठलंही संकट आलं तरी काळ त्याच्या गतीनं पुढे जातच राहतो. ठरावीक वेळी ठराविक गोष्टी होतच राहतात. सर्वच क्षेत्रांप्रमाणे बांधकाम व्यवसायालाही ग्राहकांची मानसिकता व येणाऱ्या खर्चाचं गणित जुळवणं अवघड झाले. कोरोनामुळे स्वतःच्या हक्काच्या घराचं महत्त्वही माणसाला समजलं हेही तितकंचं खर. त्यामुळे लॉकडाऊन उठताच अनेक ठिकाणी घरांची नोंदणी झाल्याचंही सकारात्मक चित्र पाहायला मिळालं. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसभर घरं जवळजवळ रिकामीच असायची. झोपण्यापुरतं घर अशी जणू घराची व्याख्या झाली होती. त्या घराचे दिवस पालटले. भरली घरं हे वर्तमान झालं. सतत माणसांचा वावर त्यामुळे जिवंतपणा आला. विलगीकरणामुळं, वर्क फ्रॉम होममुळे अजून एका खोलीची गरज जाणवू लागली. त्यामुळे निश्चितच भावी काळात बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या कमी होऊन पुणे व परिसरातील सदनिका घेण्याकडे लोकांचा कल वाढणार आहे. सरकारचे धोरण, बांधकाम व्यावसायिकांनी दिलेली सूट, डिजिटल माध्यमाचा वापर करून घर शोधणाऱ्या मंडळींना दिलेली तत्पर व ऑनलाईन सेवा यांमुळे बराच फायदा विकसकांना व ग्राहकांना भावी काळात होणार आहे. आमच्या कंपनीने तर काही खासगी बँकांबरोबर करार करून इंटरेस्ट फ्री लोन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.
जसजसा काळ बदलत जातो, तसतशा आवडीनिवडीदेखील बदलू लागतात. घराच्या बाबतीतदेखील अगदी असेच होते. गरज म्हणून, हौस म्हणून घरांचे स्वरूप आता बदलत चालले आहे. उंच इमारती, मोठी बाल्कनी, सिक्युरिटी, मोठे निवासी संकुल, बगीचा, जिम, मॉल आता कोरोनानंतर काय तर वायफाय पॉड्स, कॉ वर्किंग एरिया हे सगळंच आता घर घेताना विचारात घेतलं जातंय. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाची संकुलं उभारून ग्राहकांना हव्या असलेल्या सर्व सुविधा त्यांचं बजेट पाहून उपलब्ध करून देत आहेत. एकूणच चांगल्या सोयी, राहण्यायोग्य अनुकूल वातावरण, परवडणाऱ्या बजेटमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असलेली घरे, रस्ते, वाहतूक, आकर्षक इमारती, रोजगार, आजूबाजूच्या गावांची उत्तम कनेक्टिविटी यांमुळे अल्पावधीतच कोंढवा, कात्रज परिसराचे रुपडं पालटणार हे निश्चित.