सदैव निसर्गाचाच ध्यास
- प्रमोद वाणी
- संचालक, पाटे डेव्हलपर्स
सहकारनगरमधील पाटे संस्कृती संकुलातील वन बेडरुम हॉल किचन, अशा सदनिकेमध्ये आम्ही १४-१५ जण कसेबसे राहत होतो. ही गोष्ट ३०-३५ वर्षांपूर्वीची. तेथून सुरु झालेला हा प्रवास आता ४ बेडरुमच्या निसर्गरम्य अशा सदनिकेत आम्ही चौघेजण राहत आहोत इथपर्यंत आला आहे. मॉडेल कॉलनीतील मी स्वत:च बांधलेल्या मानस अपार्टमेंटमध्ये आठव्या मजल्यावर सुमारे साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये माझे घर आहे.
पाटे संस्कृतीनंतर आम्ही डीएसके चिंतामणीशेजारील पाटे हाईट्सच्या दोन बेडरुमच्या सदनिकेत स्थलांतरित झालो. संतनगरमधील बंगल्यातही वास्तव्य राहिले. सहकारनगर परिसर हा निसर्गाने समृद्ध असा परिसर होता. त्या निसर्गाचीच ओढ मनात कायम घर करून राहिली.
मॉडेल कॉलनीतील मुख्य चौकात असलेली आमची ही सदनिका निसर्गरम्य परिसराने वेढली गेली आहे. मास्टर बेडरुमच्या तिन्ही बाजूंनी तुम्हाला केवळ आणि केवळ हिरवाकंच असा परिसर दिसतो. बैठकीच्या कक्षाला लागूनच असलेल्या टेरेसमध्ये बसून तुम्ही चहाचे घोट रिचवत कुटुंबीय, पाहुण्यांसह तास न् तास निसर्गरम्य परिसर पाहू शकता. मुख्य हॉलच्या एका बाजूला कॉन्व्हेंट शाळा आहे. त्याबाजूने निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी भव्य अशी काचेची भिंत बसविली आहे. त्यामुळे बैठकीचा हॉल हा भव्य तर दिसतोच मात्र तो आल्हाददायकही झाला आहे.
मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना स्वतंत्र खोली आहे. मुलगी चित्रकार असल्यामुळे तिच्या खोलीची रचना, कलाकाराची खोली अशा पद्धतीने करण्यात आली आहे. तिने चितारलेले चित्र हे घरातील भिंतींची शोभा वाढवतात. आईसाठी असलेला कक्ष हा पारंपारिक ठेवण्यात आला असून, आवश्यक त्या सर्व सुविधा तेथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलासाठी देखील त्याच्या आवडीच्या अशा सर्व वस्तू कक्षातच कशा मिळतील अशी रचना करण्यात आली आहे.
आमच्या घराचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मिनी थिएटर होय. या सुविधेचा उपयोग आम्ही गेल्या दीड वर्षातील लॉकडाऊनच्या काळात पुरेपूर घेतला आहे. तुलनेने छोटा म्हणजे सव्वाशे चौरसफुटाचा हा कक्ष आम्हा कुटुंबियांसह पाहुण्यांसाठी आकर्षणाचे आणि विरंगुळ्याचे केंद्र झाले आहे. या कक्षाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अतिथींच्या मुक्कामाची सोय तेथे करता येईल अशा पद्धतीने बैठकव्यवस्था करण्यात आली आहे.
चारच वर्षांपूर्वी मी कुटुंबियांसह येथे रहावयास आलो आहे. मात्र या वास्तूमुळे आम्ही सर्वजण जीवनाचा आनंद रसरसून उपभोगत आहोत.
(शब्दांकन : दीपक मुनोत)
(घराचा फोटो आणि बांधकाम व्यावसायिकाचा फोटो जेएमएडीट वर आहे)