(डमी ११७०)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील एक रस्ता, गल्ली किंवा चौक असा नाही की तिथे मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त नाही़ आज शहराच्या विविध भागात साधारणत: वीस ते तीस माणसांमागे एक कुत्रा मोकाट फिरत असून, काही ठिकाणी तर या कुत्र्यांच्या टोळक्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे़ महापालिका या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी दरमहिन्याला लाखो रुपये खर्च करीत आहे, पण ही मोकाट कुत्री दिवसेंदिवसच वाढतच चालत आहेत़ त्यांच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून चालणे काय, पण दुचाकी घेऊनही बाहेर पडले तर कधी यांचा पाठलाग सुरू होईल याची धास्ती प्रत्येकाच्या मनात कायमच राहत आहे़
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या मालकीचे दोन व खासगी संस्थेच्या माध्यमातून असे ३ डॉग पॉड कार्यरत आहेत़ येथे भटकी व मोकाट कुत्रे यांची नसबंदी शस्त्रक्रिया, ॲटी रेबीज लस व कॉलर लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाते़ तर दोन खासगी संस्थांच्या (ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाची मान्यता असलेल्या) श्वानगृहात त्यांच्याच वाहनांनी ही भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदी करून पुन्हा सोडली जात असल्याचे महापालिकेने सांगण्यात आले आहे़
या सर्व प्रक्रियेत म्हणजे कुत्रा पकड्यासाठी आवश्यक श्वानवाहन, प्रशिक्षित मनुष्यबळ, नसबंदी खर्च व त्यानंतर आठ दिवसांचा देखभाल आदींवर महापालिका दरमहा एक कुत्र्यावर १ हजार ६४९ खर्च करीत आहे़ एकीकडे हा दावा करण्यात येत असला, तरी आजची शहरातील कुत्र्यांची संख्या पाहून यातून आऊट पूट काय? हा गहन प्रश्न समोर येत आहे़ परिणामी, या मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी आता महापालिकेसह सर्व सामान्य नागरिकांनीही ॲक्शन मोडमध्ये येणे ही शहराची गरज झाली आहे़ सध्या महापालिकेची प्रत्येक विभागनिहाय ५ श्वान वाहने, खासगी संस्थांची ८ वाहने कार्यरत आहेत, या सर्वांच्या माध्यमातून मे, २०२० पासून मार्च २१ पर्यंत १४ हजार १३७ कुत्री पकडण्यात आली आहेत़
-----------------------
पुण्य कमविण्याचा सोस येतोय अंगलट !
(डमी ११७० पार्ट 2)
पुणे :
चौकट १
पुण्य कमविण्याचा सोस येतोय अंगलट !
शहरातील अनेक नागरिक चांगल्या भावनेने या भटक्या कुत्र्यांना स्व:खर्चाने दररोज खाद्यपदार्थ देतात़ मुक्या प्राण्यांवर दया-प्रेम दाखविणे हे वावगेही नाही़ मात्र, आज शहरातील अशी काही ठिकाणे व रस्ते आहेत की जेथे दररोजच्या ठराविक वेळी ही मोकाट व भटकी कुत्री जमा होतात़ एखाद्यावेळी खाद्यपदार्थ देणारी गाडी आली नाही, तर ही कुत्री सैरावैरा होऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास देतात़ त्यामुळे काही जणांना पुण्य कमविण्याचा सोस इतरांच्या मात्र अंगलट येत आहे़
---------------------
चौकट २
‘कुत्रा आडवा आला म्हणून पडलो’
रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाताना ही भटकी कुत्री झुंडीच्या झुंडीने पाठलाग करतात़ यामुळे भेदरलेला दुचाकी स्वार एकतर जोरात गाडी पळविण्याचा विचार करतो अथवा त्यांच्या तावडीत सापडतो़ यातून अनेक अपघात नित्याने घडत असून, ‘कुत्रा आडवा आला म्हणून दुचाकीवरून पडलो’ हे आता शहरातील प्रत्येक रस्त्यावर नित्याचे झाले आहे़
--------------
शहरातील २०२१ मधील श्वानदंश अथवा अन्य प्राण्याच्या हल्ल्यात भीतीने उपचार घेतलेल्यांची संख्या
महिना श्वानदंश
जानेवारी :- १ हजार ६१०
फेब्रुवारी :- १ हजार ५९७
मार्च :- १ हजार ६६८
एप्रिल :- १ हजार २२०
मे :- १ हजार १७९
जून :- १ हजार ६०८
जुलै :- १ हजार ९९१
---------------
कोट :-
कुत्र्याच्या हल्ल्यामुळे लागलीच नागरिक महापालिकेच्या दवाखान्यांसह खासगी रुग्णालयातही खबरदारी म्हणून उपचारास जातात़ मात्र, कुत्र्यांच्या चाव्यामुळे (रेबीज) शहरात आत्तापर्यंत कोणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही़ महापालिका स्तरावर अधिकाधिक मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याची कार्यवाही केली जात आहे, यात खासगी संस्थांचाही हातभार लाभत आहे़
डॉ. सारिका फुंदे, आरोग्य विभाग, पुणे महापालिका़
-----------------