नीलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हॉटेल, सोसायट्या, मॉल, खाजगी हॉस्पिटलमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये डेंग्यू, मलेरियाची उत्पत्ती होत नाही ना, याची काळजी महापालिका घेते. पण महापालिकेच्या आरोग्य विभागातील कीटक प्रतिबंधक विभागाने मात्र स्वत:च्याच कमला नेहरू हॉस्पिटलकडे दुर्लक्ष केले आहे़ गेल्या कित्येक दिवसांपासून हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, येथे येणाऱ्या शेकडो रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना गटाराच्या पाण्यामधून ये-जा करावी लागत आहे़
सर्वसामान्य नागरिकांना डेंग्यू, मलेरियाच्या डासांना तुम्ही निमंत्रित करीत आहात, म्हणून ५० रूपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दंडाचा कारवाईचा बडगा उगारणाऱ्या, महापालिकेच्या आरोग्य विभागाला ‘स्वत:च्या दिव्याखालील अंधार’ मात्र दिसत नाही ही शोकांतिका आहे़
हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गटाराचे पाणी येत असून, ते बाहेर पडण्यास कोणताही मार्ग नाही़ यामुळे सांडपाण्याचे येथे डबकेच झाले असून, याच पाण्यात नागरिकांना गाड्या पार्किंग करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही़ त्यातच पार्किंगच्या कोपऱ्यात तुटलेल्या खुर्च्या, टेबल, खराब वैद्यकीय साहित्य यांचा भरणाच झाला आहे़ सतत पाणी साचून राहिल्याने येथे विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या विषाणूंची निर्मिती होत आहे़
कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आज शहरातील सर्वाधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे़ तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची यामुळे येथे मोठी वर्दळ वाढली आहे़ एकीकडे महापालिका कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय करत असतानाच, दुसरीकडे मात्र डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना निमंत्रण देणाऱ्या गोष्टींकडे स्वत:च्याच हॉस्पिटलकडे दुर्लक्ष करीत आहे़
--------------------------
ड्रेनेजची पाइपलाइन बदलण्याचे काम सुरू
कमला नेहरू हॉस्पिटलमधील ड्रेनेजची पाइपलाइन जुन्या झाल्यामुळे त्या लिक झाल्या असल्याने, त्यातून हे सांडपाणी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये जात आहे़ याविषयी महापालिकेच्या भवन रचना विभागासाठी बोलणे झाले असून, हॉस्पिटलमधील लिक्विड आॅक्सिजन प्लँट येथील पाइपलाइन पूर्णपणे बदलली आहे़ याचबरोबर इतर पाइपलाइन बदलण्यासाठी सर्व बाथरूम बंद करावे लागणार आहेत़ परंतु, या आठवड्यात हे सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे़
डॉ़ लता त्रिंभके, अधीक्षक, कमला नेहरू हॉस्पिटल
-----------------
फोटो मेल केला आहे़