पुणे : वारजे येथे खड्डयात कोसळलेल्या बसचा अपघात एका छोट्याशा लॉक पिनने केल्याचे समोर आले आहे. स्टेअरिंगला असलेल्या नटबोल्टला ही पिन नसल्याने रॉड निसटून अपघात झाला. तसेच त्यानंतर तपासणी करण्यात आलेल्या ठेकेदारांकडील काही बसेसच्या स्टेअरिंगलाही लॉक पिन नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दररोज रस्त्यांवर धोकादायक स्थितीत बस धावत असल्याचे भयाण वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.मुंबई-पुणे महामार्गालगत वारजेकडे जाणाऱ्या जोडरस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस खड्यात कोसळल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसमधील सुमारे २० प्रवासी जखमी झाले. पण या अपघाताने असुरक्षित बस प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.पीएमपीने ठेकेदारांकडून भाडेतत्वावर घेतलेल्या सुमारे ४५० बस सध्या मार्गावर धावत आहेत. अपघातग्रस्त बसही त्यापैकीच एक होती. त्यामुळे अपघातानंतर पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांकडील सर्व बसेसचे तांत्रिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. भाडेतत्वावरील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वच बसेसची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अपघातानंतर त्याच्या कारणांवरून विविध तर्कवितर्क लढविण्यात आले. बसचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे, स्टेअरिंग रॉड तुटल्याच्या चर्चा रंगल्या. पण पीएमपीतील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष बसची पाहणी केल्यानंतर स्टेअरिंग रॉडला असलेल्या नट-बोल्टला लॉक पिन नसल्याचे समोर आले. सततच्या धडधडीमुळे बोल्ट निघू नये, यासाठी ही पिन बसविली जाते. स्टेअरिंगच्या नटबोल्टही ही पिन नसल्याने बोल्ट हळूहळू ढिला होत जाऊन निघाला. त्यामुळे स्टेअरिंग व मुख्य रॉडला जोडून ठेवणारा नटही पडला. परिणामी चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण गेल्याने बस खड्डयात आदळली. हीच ‘लॉक पिन’ काही बसेसमध्ये नसल्याचे तपासणीमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे दररोज रस्त्यांवरून फिरणाऱ्या अनेक बस नागरिकांसाठी टांगती तलवार ठरत असल्याचे स्पष्ट होते.
या कारणामुळे वारजे पुलावरून कोसळली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 8:14 PM