पुणे : रामनाथ चव्हाण यांच्या लेखनात विद्रोहाचा आवेश असला, तरी त्यांनी कधीही कोणत्याही जातीचा विद्वेष केला नाही. वंचितांचा आणि उपेक्षितांचा चेहरा समाजापुढे आणणारा एक संशोधक लेखक आपल्यातून हरपल्याची भावना मंगळवारी येथे व्यक्त झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेत चव्हाण यांना आदरांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे भोसले, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे या वेळी उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, ‘‘समाजाची वस्तुस्थिती प्रकट करणारा हा संशोधक लेखक होता. मात्र, समाजाने त्यांचा हवा तितका विचार केला नाही. कारण त्यांनी कोणत्या एका जाती-जमातीवर लिहिले नाही.चव्हाण यांच्यात विद्रोहाचा एक आवेश होता. मात्र, विद्वेषाचा कोणताही अभिनिवेश नव्हता. ते एक संशोधक वृत्ती असलेले लेखक असल्याचे गौरवोद्गार शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी यांनी काढले. पोट भरण्यासाठी त्यांनी अगदी रस्त्यावर चित्र काढण्यापासून ते विद्यापीठात रोजंदारीवर काम केले. मात्र, कधी त्यांनी त्यांच्या दारिद्र्याचे भांडवल केले नाही. कोणाच्या आधाराशिवाय वाढलेले ते व्यक्ती होते. विशेष म्हणजे कोणत्याही जातीचे लेबल त्यांनी स्वत:ला चिटकू दिले नाही, असे विलास वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उपेक्षितांचा चेहरा मांडणारा विद्रोही
By admin | Published: April 26, 2017 4:19 AM