पुणे/धनकवडी : बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी सुरुवातीला नाम फलकाला काळे फासले, त्यानंतर आमदार तानाजी सावंत गद्दार असल्याच्या घोषणा देत कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि काचांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
राज्यातील आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसैनिक अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. असे असताना दक्षिण उपनगरातील शिवसैनिकामध्ये असलेला असंतोष आज उफाळून आला आणि पहिल्यापासून पक्षात नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
एकनाथ शिंदे आणि पक्षात फुट पाडण्यात आमदार तानाजी सावंत जबाबदार असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. माजी नगरसेवक विशाल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलाण धनावडे, सुनिल पायगुडे, परेश खडके व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दोनच दिवसांपूर्वी कात्रजमधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालया समोर नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले. यानंतर पोलिसांनी याठिकाणी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.