पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:22 PM2024-11-05T14:22:17+5:302024-11-05T14:22:57+5:30

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल

Rebellion in most places in Pune; In 8 out of 21 constituencies, the real fight will be between Pawar and Pawar | पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

पुणे : जिल्ह्यातील २१ मतदारसंघांतील लढती सोमवारी दुपारी ३ नंतर निश्चित झाल्या. यातील बारामती विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात हाय व्होल्टेज ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होत आहे. अन्य मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणी बंडखोरी झाली आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत असली, तरीही बहुतेक बारामती, वडगाव शेरी, हडपसर, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी, इंदापूर, शिरूर अशा काही मतदारसंघांत खरी लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार, अशीच होणार असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि भाजप उमेदवार यांच्यामध्ये काट्याची टक्कर होईल, असे चित्र आहे.

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल, अशी चर्चा प्रत्यक्ष प्रचार किंवा निवडणुकीपूर्वीच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार इथे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आहेत, तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार लढत देत आहेत. त्यामुळेच या मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. ही खरी लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच असल्याचे बोलले जात आहे. जाहीर सभा, प्रचारफेऱ्या, वैयक्तिक गाठीभेटी यांचा धुरळाच या मतदारसंघात प्रचाराच्या १४ दिवसांत उडेल, असे बोलले जात आहे.

बंडखोर उमेदवार ठरतील निर्णायक

दिवाळीनंतर सोमवारी जिल्ह्यातील राजकीय हालचालींनी एकदम गती घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असल्याने सर्वच नेते बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात गुंतले होते. त्यातील काहींनी नेत्यांच्या म्हणण्याला मान देत, काहींनी स्वत:च्या मागण्यांवर आश्वासन घेत उमेदवारी अर्ज मागे घेतले, तरीही काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. त्यात प्रामुख्याने पुणे शहरात कसबा, शिवाजीनगर, पर्वती, तर जिल्ह्यात जुन्नर, इंदापूर, पुरंदर, भोर या मतदारसंघांचा समावेश आहे. या ठिकाणच्या लढतींमध्ये बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

हाय व्होल्टेज मतदारसंघ

बारामती

उमेदवार
अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

युगेंद्र पवार- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
संदीप चोपडे- (रासप)

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत असलेले मतदार संघ

वडगाव शेरी

सुनील टिंगरे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
बापू पठारे- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

हडपसर 

चेतन तुपे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
प्रशांत जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 

जुन्नर

 अतुल बेनके ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
 सत्यशील शेरकर ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
 शरद साेनवणे  (अपक्ष)
 आशाताई बुचके (अपक्ष )
 देवराम लांडे (वंचित आघाडी)

आंबेगाव 

 दिलीप वळसे-पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
 देवदत्त निकम ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
 सुरेखा निघोट (उबाठा-अपक्ष) 
 सुनील इंदोरे (अपक्ष)

 शिरुर 

१. ज्ञानेश्वर कटके ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
२. अशोक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

इंदापूर 

 दत्तात्रय भरणे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) 
 हर्षवर्धन पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
 प्रवीण माने (अपक्ष)
 तानाजी शिंगाडे (अपक्ष)

 पिंपरी
 
 अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) 
 विरुद्ध सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार)

Web Title: Rebellion in most places in Pune; In 8 out of 21 constituencies, the real fight will be between Pawar and Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.