पुणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस आता इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) या प्रणालीचा वापर करणार आहेत. एआय तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे. चौकामध्ये एखाद्या वाहनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर अवघ्या पाच मिनिटांत दंडाची पावती त्या वाहनचालकाच्या मोबाइलवर फोटोसह जाणार आहे. त्यासाठी पोलिस ॲटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नेशन कॅमेऱ्याची (एएनपीआर अर्थात स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा) मदत घेणार आहेत.
याबाबत पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. लवकरच सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार असून, कामाला सुरुवातही होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सद्य:स्थितीला शहरात स्मार्ट सिटीचे ४३० आणि गुन्हे संदर्भातील १ हजार ३४१ कॅमेरे कार्यरत आहेत.
देशात सर्वाधिक वाहनांची संख्या असणाऱ्या शहरात पुण्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहतूक विभागाकडील अपुरे मनुष्यबळ, वाहतूक नियमन यासह विविध कामांमुळे अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिसांना मर्यादा येतात. दुसरीकडे नियंत्रण कक्षातून कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करताना एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष ठेवता येत नाही. त्यामुळे पोलिस सिग्नलवरील कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर करून ही स्मार्ट यंत्रणा लागू करण्याच्या विचाराधीन आहेत.
सध्याच्या परिस्थितीत नियंत्रण कक्षात बसलेले पोलिस कॅमेऱ्यांवरून चौक निवडतात. त्याद्वारे चौकात सिग्नल तोडणारे, ट्रिपलसीट येणारे दुचाकीस्वार, झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली वाहने यांच्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतात. त्यामध्ये संबंधित वाहनांचा नंबर असतो. पुढे ही माहिती त्या-त्या वाहतूक विभागाला वाहनांच्या फोटोसह दिली जाते. त्यानंतर तेथून त्या वाहनचालकाच्या मोबाइलवर दंडाची पावती फोटोसह पाठवली जाते. मात्र, आता या प्रणालीच्या माध्यमातून नियमभंग होताच काही मिनिटांत दंडाची पावती वाहनचालकाच्या मोबाइलवर येणार आहे.
अशी हाेणार कारवाई
इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रणालीच्या माध्यमातून चौकांत, रस्त्यांवर लावण्यात आलेले कॅमेरे प्रादेशिक परिवहन विभागाच्या ‘सारथी’ आणि ‘वाहन’ या संकेतस्थळाला जोडले जाणार आहेत. हे सर्व कॅमेरे हायटेक असणार आहेत. वाहनचालकांनी नियम मोडताच हे कॅमेरे स्वतः वाहनचालकांचा फोटो काढतील. कॅमेरा सारथी आणि वाहन या यंत्रणेला कनेक्ट असल्याने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना मेसेज करून दंडाची रक्कम मोबाइल क्रमांकावर पाठवणार आहे. यात ओव्हर स्पीड, सिग्नल न पाळणे यांसारख्या नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे.