प्रशांत ननवरे
बारामती : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती शहरात रविवारी(दि १८) पोहचली. अवघी बारामती वारीमय झालेली पहावयास मिळाले. यावेळी टाळ - मृदंग, गुलाबपाण्याचा शिडकाव्याचा सुगंध आणि विठोबाचा जयघोषाने अवघा आसमंत भारावला. शहराच्या वेशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकाºयांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पवार हे शहराच्या वेशीपासुनच पालखी रथात स्वार झालेल्या पवार यांनी पालखी रथाचे सारथ्य देखील केले.
पवार यांनी काही वेळ फुगडी खेळण्याचा आनंद देखील घेतला. पवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले. नगरपालिकेच्या वतीने चौकात सजावट करण्यात आली होती, वारक-यांच्या शिल्पाला देखील फुलांची सजावट करण्यात आली होती. इरीगेशन वसाहतीजवळ काही काळ दर्शनासाठी पालखी सोहळा थांबल्यानतर सायंकाळी सातच्या सुमारास शारदा प्रांगणातील भव्य शामियानाज सोहळा मुक्कामी विसावला.
अनेक बारामतीकर उंडवडीपासून बारामतीपर्यंत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. वारक-यांची गैरसोय होऊ नये या साठी प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. शारदा प्रांगणात पालखी विसावल्यानंतर समाजआरती होणार आहे. रात्री भजन व कीर्तन देखील होणार आहे. दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी पाटस रस्त्यापासून ते शारदा प्रांगणापर्यंत मोठी गर्दी उसळली होती.