लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला केंद्र सरकारच्या ‘एनएमसी’ अर्थात ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने आज (दि. १६) मान्यता दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मंगळवार पेठेतील सणस विद्यालय आणि कमला नेहरू रुग्णालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षासाठी प्रवेश दिले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सन २०१७ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष असताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली होती. मागील साडेतीन-चार वर्षांत सर्वसाधारण सभेच्या मान्यतेपासून राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांची मंजुरी घेण्यात आली. गुरुवारी (दि. १६) अखेरीस नॅशनल मेडिकल कमिशनने परवानगी दिल्याने महाविद्यालय उभारणीचा महापालिकेपुढील मार्ग मोकळा झाला आहे. आता केवळ केंद्र सरकारकडून याचे लेखी आदेश प्राप्त होण्याची कार्यालयीन प्रक्रिया बाकी राहिली आहे. ती लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
अहमदाबादच्या धर्तीवर ट्रस्टच्या माध्यमातून या महाविद्यालय व रुग्णालयाचे व्यवस्थापन होणार आहे. या ट्रस्टमध्ये महापौरांसह सर्व पदाधिकारी व गटनेत्यांचा समावेश आहे. सुरूवातीच्या टप्प्यात सणस विद्यालय व कमला नेहरू रुग्णालयात महाविद्यालय चालविण्यात येणार आहे. या काळात डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाचे वर्ग व ५०० खाट क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात येईल. तर डॉ. नायडू रुग्णालय बाणेर अथवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाहीही पार पाडली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ६५२ कोटी रुपये खर्च होणार आहे.
चौकट
प्रवेश प्रक्रिया यंदाच
“महापालिका स्तरावर आणि विशेषत: अंतिम मंजुरी मिळेपर्यंत मोठ्या तांत्रिक प्रक्रिया या मार्गात होत्या. या प्रक्रियेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि आत्ताचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि राज्य सरकार यांचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल पुणेकरांच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद ! आता प्रवेश प्रक्रिया राबवून याच वर्षी वैद्यकीय सुरुवात होईल, याचाही विशेष आनंद आहे.”
-मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे