पुणे : दौंड तालु्क्यातील केडगाव येथील मोहन रुग्णालयाची कोविड हेल्थ केअर सेंटर म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. २८ एप्रिल रोजी येथे एकाच दिवशी चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचेही चौकशीत दिसून आले आहे. मात्र, मोहन रुग्णालयात कोरोनासंदर्भातील नियमावली पाळली जात नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे. चार रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यावर दौंड तहसीलदारांमार्फत या रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले आहे. रुग्णांच्या नोंदी नसल्याबरोबर अतिदक्षता विभागात क्षमतेपेक्षा जास्त बेड होते. त्यामध्ये दोन फुटांचे अंतरही नव्हते. रुग्णालयाने ऑक्सिजन ऑडिट प्रमाणपत्रही सादर केले नाही.
रुग्णालयात सध्या असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, नव्याने रुग्ण घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
चौकट
रुग्णांकडून अवाच्चा सवा बिल
१ एप्रिल ते १ मे २०२१ दरम्यानच्या रुग्णालयातील ५९ बिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ लाख ५६ हजार ८१० रुपये बिल जादा घेतल्याचे दिसून आले. मोहन रुग्णालयात रुग्णांकडून अवाच्या सवा बिल वसूल केले जात असल्याचेही दिसून आले आहे. योगेश विलास गायकवाड यांचे बिल ८७ हजार रुपये आले होते. मात्र, विमाकंपनीकडून २,७७,९०३ बिल घेण्यात आले. रुग्णालयाने जादा घेतलेले बिल वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.