पुणे : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीयमहाविद्यालयाला (atal bihari medical college pune) गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने मान्यता दिली आहे. यामुळे महापालिकेला वैद्यकीयमहाविद्यालय सुरू करण्यासाठीची शेवटची व आवश्यक असलेली अंतिम मान्यताही मिळाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयास सर्व परवानग्या मिळाल्याने, येत्या शैक्षणिक वर्षासाठी येत्या काही दिवसांत विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली, तर विद्यापीठाच्या पथकाने आपल्या पाहणीत ज्या काही त्रुटी काढल्या आहेत, त्याची पूर्तता येत्या काही दिवसांत तातडीने केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले़
महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालयाची केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यावर, ७ मार्च रोजी लेटर ऑफ इनटेंट देऊन १०० जागांवर प्रवेश करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आली. त्याआधारे राज्य शासनाकडे महापालिकेने प्रस्ताव पाठवला असता शासनाने याबाबतचा आदेश काढून २०२१-२२ च्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. यामुळे सीईटी सेलमार्फत एमबीबीएसच्या फेरीमध्ये या १०० जागा उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या पथकाने नुकतीच पुण्यात येऊन महाविद्यालयातील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृह यासह इतर सुविधांची पाहणी केली होती. गुरुवारी त्याबाबतची अंतिम मान्यता मिळाल्याने महापालिकेकडून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाकरिता सर्व मान्यता मिळाल्या असून, येत्या आठ दिवसांत १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया होणार असून, महाविद्यालयांच्या यादीमध्ये महापालिकेच्या महाविद्यालयाचे नाव समाविष्ट केले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हा पर्याय खुला होणार असून, सध्या वैद्यकीय विभागाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.