पुणे: अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुलगा आणि मुलींमध्ये दुजाभाव नको असा संदेश देणारा ‘बाईपण भारी देवा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, द्रौपदी मर्मू, लता मंगेशकर, कल्पना चावला, किरण बेदी, डॉ. आनंदीबाई जोशी, सिंधुताई सकपाळ, सानिया मिर्झा, सुधा मूर्ती या महिलांनी आपआपल्या क्षेत्रात सर्वोच्च यश संपादन केले. अशा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख करून देत, मुलगा आणि मुली यांच्यामध्ये दुजाभाव करू नका असा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे.
जनवाडी परिसरातील वस्ती विभागातील मुलींनी या देखाव्यात अभिनय केला आहे. या मुलींना सायकली भेट देण्यात येणार आहेत. किलबिल शाळा आणि जागृती सेवा संस्था यांचे सहकार्य लाभले आहे. जनवाडी गोखलेनगर परिसरातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा मंडळाचा नावलौकिक आहे. मंडळ या वर्षी 61 वे वर्ष साजरे करीत आहे. अंध, अपंग, तृतीय पंथी व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूंचे किट व साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, वारकऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा स्थानिक मुलांकडून पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवणे हा उपक्रम मंडळांनी घेतला. पानशेत पुरानंतर स्थापन झालेले परिसरातील हे पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.
नरेश कांबळे मंडळाचे अध्यक्ष असून उमेश वाघ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. विनोद सकट, अभिजीत धाडवे, अशोक खुडे, गौरव शिंदे, विवेक कांबळे, अमित घोलप, योगेश शिंगारे, गणेश कांबळे, विलास खराडे, संकेत बगाडे हे प्रमुख पदाधिकारी आहेत.