लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वत:ची ओळख म्हणून आधार कार्ड हवे, मतदान कार्ड हवे, पॅन कार्ड हवे, धान्याची गरज असो नसो रेशनकार्डपण हवेच, पण अनाथ मुलांना ना आईवडिलांचा आधार ना स्वत:ची ओळख. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत ससूनच्या सोफोश संस्थेतील ४० अनाथ मुलांना स्वत:ची ओळख मिळवून दिली. या मुलांना आधार कार्ड नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या मुलांना सध्या केवळ त्याच्या नावाने आधार कार्ड देण्यात आले असून, मुलांना कोणी दत्तक घेतल्यास आधार कार्डवर आडनाव लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष घटकातील लोकांना आधार कार्ड वाटप करण्यासाठी खास मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये आतापर्यंत तृतीयपंथीय नागरिकांना, येरवडा कारागृहातील तब्बल तीनशेहून अधिक कैदी आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड वाटप करण्यात आले. या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून सोफोश ससून संस्थेतील अनाथ मुलांना आधार कार्ड वाटप करण्यात आले. आधार कार्डसाठी आईवडील, पत्ता व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज असते. परंतु सोफोश संस्थेतील या अनाथ मुलांना आधार कार्ड वाटप करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे संस्थेच्या नाव पत्त्यावर व संस्थेने दिलेल्या नावाच्या आधारे या मुलांना आधार कार्ड वाटप केले जाते, अशी माहिती प्रकल्प संचालक मनोज जाधव यांनी दिली.
------
आधारमुळे शासकीय योजनाचा लाभ देणे शक्य
आधार कार्डमुळे संबंधित व्यक्तीला स्वत:ची ओळख तर मिळतेच, पण विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील उपयोग होतो. परंतु केवळ आधार कार्ड किंवा ओळखपत्र नसल्याने अनेक लाभार्थी शासनाच्या या योजनांपासून वंचित राहतात. यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष घटकातील लोकांसाठी आधार कार्ड वाटपाची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
- रोहिणी आखाडे, उपजिल्हाधिकारी व यूआयडी समन्वयक
------