पुणे : राजकारणात राहून शेवटपर्यंत साधेपणा, विन्रमता जपून जनसामान्यांच्या हितांचे अनेक धाडसी निर्णय माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतले. डान्सबारमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून प्रचंड मोठा विरोध पत्करून त्यांनी डान्सबारवर बंदी आणली. त्यांच्या अकाली जाण्याने एक कॉमन मॅन हरपला. लाडक्या आबांच्या अनेक आठवणींना उजाळा देताना महापालिकेचे सभागृह गहिवरले.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व पक्षांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उमहापौर आबा बागूल म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांचा व तळागाळातील नेता अशी आर. आर. पाटील यांची ओळख होती; त्यामुळेच ते सर्वसामान्यांत लोकप्रिय ठरले.’’मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्यांना नेहमीच भावले; त्यामुळे त्यांची कारकीर्द सातत्याने बहरतच गेली. सर्वसामान्यांचा नेता अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणाची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तळागाळातील नागरिकांना न्याय देता येईल, अशा खात्यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, असे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी सांगितले.भाजपाचे गटनेते गणेश बिडकर म्हणाले, ‘‘चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती; याच बळावर गेल्या काही वर्षांच्या राजकारणात त्यांनी झंझावात निर्माण केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला खूप मोठा धक्का बसला आहे.’’ काम करीत असताना त्यांनी कधीही पक्ष पाहिला नाही; त्यामुळेच ते सर्व पक्षांत लोकप्रिय ठरले, असे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी स्पष्ट केले. नम्रता, शालीनता यांमुळे ते लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची हानी झाली आहे, अशी भावना शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी व्यक्त केली. दिलखुलास आणि सर्वसामान्यांत आगळावेगळा ठसा निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा होता; त्यामुळेच ते राजकारणात लोकप्रिय नेते बनले, अशा शब्दांत अशोक येनपुरे यांनी श्रद्धांजली वाहिली. लोकाभिमुख नेता अशी त्यांची ओळख होती. माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, धनजंय जाधव, नंदा लोणकर, कमल व्यवहारे, सचिन भगत, अप्पा रेणुसे, बंडू केमसे, विशाल तांबे, विकास दांगट यांनीही या वेळी श्रद्धांजली वाहिली.
आबांच्या आठवणीने गहिवरले सभागृह
By admin | Published: February 19, 2015 1:15 AM