पुणे : पुण्याला सायकलींचं शहर म्हणून अाेळखलं जात असे. बदलत्या काळात सायकलींची जागा अाता दुचाकी अाणि चारचाकींनी घेतली अाहे. पुण्याच्या जुन्या अाठवणी पुन्हा एकदा जागवण्यासाठी अाठवणींचं पुणं...सायकलींचं पुणं या संकल्पनेवर अाधारित पुणे सायक्लाेथाॅन-2 चे अायाेजन करण्यात अाले अाहे. लाेकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा याेजना विभाग अाणि स. प. महाविद्यालय यांच्या वतीने या सायक्लाेथाॅनचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून 7 अाॅक्टाेबर राेजी सकाळी 6.30 वाजता या सायक्लाेथाॅनला सुरुवात हाेणार अाहे. स. प. महाविद्यालयाच्या आवारातून या सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे. या रॅलीमध्ये लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे व समीक्षा आमटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष शिल्पा तांबे व उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रोफेशनल आणि हौशी सायकलिंग ग्रुप्स, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, पोस्टमन, सीए, डॉक्टर्स, व्यावसायिक व नोकरदार अशा सर्वच वर्गातील लोक या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत आहेत. यंदाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे पुण्यातील अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनीही सहभागाची तयारी दर्शवलेली आहे. ही सायकल रॅली २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन प्रमुख मार्गांमध्ये विभागण्यात आली आहे.
'सायकलींचे पुणे' अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने शहरातील प्रमुख शाळा-महाविद्यालयातून सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष संदेश घेऊन येणारे ग्रुप्स, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, सर्वात छोटा सायकलस्वार अथवा सर्वात मोठा गट अश्या काही विशेष सहभागाचे कौतुक यावेळी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये मोफत सहभागी होता येणार असून, इतरांसाठी रुपये १०० इतके देणगी शुल्क असणार आहे, असे शिल्पा तांबे यांनी सांगितले.