इंदापूर - धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बारामती येथील आंदोलनादरम्यानचे गुन्हे आणि ३१ मे २०१८ रोजी चोंडी येथे जयंती उत्सवा वेळचे गुन्हे विशेषाधिकार वापरून माफ करण्याची शिफारस मी राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी इंदापूर येथे बोलताना दिली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, बाळासाहेब भेगडे, नारायण (आबा) पाटील, विधान परिषद आमदार रामहरी रूपनवर, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, कर्जत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भरत शहा, श्रीकांत देशमुख, दीपक जाधव, सचिन आरडे, पै. बजरंग राऊत इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.३१ मे रोजी चोंडी येथे जो दुर्दैवी प्रकार घडला तो क्लेशदायक आहे. त्याची पुन्हा पुनरावृत्ती होता कामा नये. महापुरुषांची जन्मस्थळे, महानिर्वाण स्थळे ही तीर्थक्षेत्रे आहेत. प्रेरणास्थळे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत करून घेतला. चोंडी गावाचा विकास करून चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. तर सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याचादेखील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. राम शिंदेयांनी दिली.
गुन्हे माफ करण्याची शिफारस करणार - मंत्री राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:21 AM