पुणे : प्रकल्पबाधितांसाठी आरक्षित असलेल्या जमिनीचे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण करून घोटाळा केल्याप्रकरणात आरोपींनी एकाच दिवसांत शेतक-यांच्या नावे अर्ज करून त्यांच्या फेरफार क्रमांकाची नोंद केल्याचे समोर आले आहे.या बाबत अटक करण्यात आलेल्या तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली नामदेव गरड (वय ४२, रा. हडपसर) हिला एक दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणी यापूर्वी कारभारी नळकांडे, तलाठी सचिन देवप्पा काळेल या दोघांना अटक करण्यात आली असून इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या नावाने शिक्रापूर तहसील कार्यालयात बनावट अर्ज तयार करून भोगवटा वर्ग बदलण्याची मागणी करण्यात आली होती. भोगवटा वर्ग बदलण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी व त्यापेक्षा मोठ्या पदावरील अधिका-यांना आहेत. तरीही तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली गरड यांनी या अर्जावर शेरा मारून भोगवटा वर्ग बदलला. त्यानंतर प्रकल्पग्रस्तशेतक-यांसाठी राखीव असेलल्या जमिनीचे बनावट आदेश तयारकरून शेतक-यांचे नावे शिरूरतहसील कार्यालयात खोटे अर्ज दाखल करून शासकीय जमिनीचे प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या नावे फेरफार नोंदी घेतल्या. शासनाच्या जमीनीची विक्री करण्यास बंदी असताना देखील चांगल्या फायद्याचे अमिष दाखवून या जमीनींची नागरिकांना विक्री करून त्यांची, शासनाची फसवणूक करण्यात आली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.या प्रकरणी गरड यांना न्यायालयात हजर केले असता, या व्यतीरिक्त अशा स्वरूपाची आणखी प्रकरणे यांनी केली आहेत का?, या गुन्ह्याची व्यप्ती मोठी असल्याने गुन्ह्याचा तपास होणे गरजेचे आहे. सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का?, याचा तपास करण्यासाठी गरड हिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली.
अर्जापासून फेरफार क्रमांकाची नोंद एकाच दिवसात, गैरव्यवहारात अशीही कार्यतत्परता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 12:30 AM