पुणे : देशातील खासगी शिकवणी (कोचिंग क्लास) उद्योगाचा व्याप हा तब्बल ४.२ लाख कोटींच्या आसपास आहे. जवळपास तितकीच रक्कम सरकारदेखील खर्च करते. इतका पैसा खर्च करूनही आपण केवळ परीक्षा आणि पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच शिकत आहोत. केवळ माहिती देण्याचे काम सध्याच्या शिक्षणपद्धतीतून होत आहे. शिक्षणातून ज्ञान देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे या शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करण्याची गरज आहे, असे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.वक्ृतत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित १४४व्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. काकोडकर यांनी गुंफले. वक्ृतत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते. टिळक स्मारक मंदिरात २० मेपर्यंत व्याख्यानमाला चालणार आहे.काकोडकर म्हणाले, शिक्षण पद्धतीने नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, हे हेरून त्याला तयार केले पाहिजे. शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाºयाची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून, सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे. ज्ञानाचा उपयोग कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात नाही.येत्या काही दशकात शाळेत जाऊन शिकविण्याची पद्धत कालबाह्य होईल. त्यामुळे पुढील पंचवीस वर्षांचा काळ लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल केले पाहिजेत. उलट खुल्या शिक्षणपद्धतीचा स्वीकार करून विषय, शिक्षक व शिक्षणसंस्था निवडण्याची विद्यार्थ्याला मुभा हवी. असे बदल झाल्यास चांगल्या शिक्षण संस्थाच केवळ टिकतील, असे डॉ. काकोडकर म्हणाले.
परीक्षेभोवती घुटमळणाऱ्या शिक्षणपद्धतीची पुनर्रचना हवी- अनिल काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 3:23 AM