प्राची आमले पुणे : ऐतिहासिक स्मृतींचा वैभवशाली वारसा जतन करावा म्हणून पुणे महापालिकेने पेशवेकालीन नानावाड्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे खरे; परंतु बाहेरून सुशोभीकरणाचा देखावा अन् आतून मात्र सुविधांची वानवा, अशी अवस्था दिसून येते.‘लोकमत’ प्रतिनिधीने ‘आॅन द स्पॉट’ जाऊन केलेल्या पाहणीमध्ये ‘आतले वास्तव’ उघड झाले आहे. यामध्ये नानावाड्यातील गळके छत, भिंतीवर उगवलेली झाडे, तुटलेले जिने, अस्वच्छ स्वच्छतागृह, पाण्याचे दुर्भिक्ष अशी परिस्थिती दिसून आली.वाड्यात आतापर्यंत महापालिकेचे महत्त्वाचे दस्तऐवज जतन करण्याचे काम अनेक वर्षे चालू होते. वाड्याचे महत्त्व वाढविण्यासाठी महापालिकेने या वाड्यात ऐतिहासिक संग्रहालय बनविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या संग्राहलयाचे कामकाजही जोरात सुरू आहे. या संग्रहालयात भारतीय स्वातंत्र्यसंग्रमाचा इतिहास दाखविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी स्वत:च्या जिवाची बाजी लावली.ती संस्कृती जपण्याचा आणि भावी पिढीमध्ये देशप्रेमाची भावना जपण्यासाठी, आदर्श ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न हा फक्त वाड्याच्या पुढील बाजूवर केला जात आहे; मात्र आतील बाजूकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, हे पाहणीतून दिसून आले.
ऐतिहासिक नानावाड्यात सुविधांची वानवा,महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:32 AM