बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजाराकडे जिल्ह्यातील सर्वात मोठी चिंचेची बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. येथील बाजारामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, भोर, फलटण आणि पुरंदर आदी ठिकाणावरून शेतकरी चिंच विक्रीसाठी आणतात. तर चिंच खरेदीसाठी लातूर, बार्शी, तुळजापूर, अहमदनगर व आंध्रप्रदेश मधून खरेदीदार येत असतात, अशी माहिती बाजार समितीचे सभापती वसंतराव गावडे यांनी दिली.
येथील चिंचेचा बाजार शनिवारचा असतो. मात्र आवक वाढल्याने रविवारीही चिंचेचे लिलाव सुरु असतात. या वेळी येथील उपबाजारात चिंचेच्या एकूण १० हजार ३४१ पोत्यांची आवक झाली. तर अखंड चिंचेस १६११ ते २६०० व फोडलेल्या चिंचेस ५ हजार ते ७ हजार १०० रुपये बाजार भाव मिळाला. तसेच चिंचोक्यास १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल बाजार मिळाल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने एकूण चोवीस हजार पोत्यांची आवक झाली होती. चालू वर्षी आजअखेर ४५ हजार ९२९ पोत्यांची आवक झाल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. येथील चिंच लिलाव दर शनिवारी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चिंच विक्रीसाठी आणावी. तसेच चिंचेचे लिलाव मे अखेरपर्यंत चालतील, अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय सणस यांनी दिली.
येथील मागील आठवड्यात चिंचेची मोठी आवक झाल्याने बाजारभावात घसरण झाली. तसेच वर्षे अखेर व महिना अखेरच्या सुट्ट्या आल्याने बाजारभावावर परिणाम झाल्याची माहिती येथील आडत व्यापारी सुभाष चांदगुडे यांनी दिली.
-
सुपे येथील बाजारात चिंचेची आवक वाढल्याने रविवारी चिंचेचे लिलाव सुरु होते.