लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालया’ची जगातील सर्वांत मोठे क्रिकेट संग्रहालय म्हणून नोंद करण्यात आली आहे. या संग्रहालयात जगातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या ५१ हजारांहून अधिक वस्तूंचा संग्रह आहे. पाच हजार चौरस फुटाच्या या गॅलरीला अमेरिकेतील मिआमी येथील ‘वर्ल्ड रेकॉर्ड अकादमी’ने ‘विश्वविक्रमा’ने पुरस्कृत केल्याचे संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांनी सांगितले.
या गॅलरीमध्ये अनेक बॅट आणि क्रिकेट बॉल आहेत ज्यावर, त्या-त्या वर्षीच्या विश्वचषक विजेत्या संघांच्या कर्णधारांची स्वाक्षरी आहे. शिवाय सर डोनाल्ड ब्रॅडमॅन, कपिल देव, महेंद्रसिंह धोनी, डेसमंड हेन्स, सर विव्ह रिचर्ड, इम्रान खान, सुनील गावस्कर अशा अनेक खेळाडूंनी वापरलेले क्रिकेट साहित्य आहे. सध्या हयात नसलेल्या अनेक नामवंत खेळाडूंच्या दुर्मिळ क्रिकेट साहित्याचे येथे संकलन आहे.
पाटे म्हणाले, “क्रिकेट हा भारतीयांसाठी धर्मच आहे. या खेळाकडे असणारा माझा ओढा आणि आवड यातूनच हे सारे घडले. महाराष्ट्रातील या क्रिकेट संग्रहालयाला जागतिक स्तरावर मिळालेल्या मान्यतेमुळे मला आता भारतातील सर्व मोठ्या शहरात असे संग्रहालय सुरू करायचे आहे. याची सुरुवात मी मुंबईपासून करणार आहे.”