पुणे : लोहगाव विमानतळावरूनआंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यानंतर विमानांच्या फेऱ्या व प्रवाशांची ये-जा चांगलीच वाढली आहे. यामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत आहे. शुक्रवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३१ हजार ५२ प्रवाशांची ये-जा झाल्याची नोंद विमानतळ प्रशासनाकडे झाली आहे. प्रवाशांबरोबरच शुक्रवारी विमानांचे सर्वाधिक १८६ वेळा टेकऑफ आणि लँडिंग झाले.
कोरोनानंतर पुणे विमानतळावरून विमानसेवा सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत सुरू होती. धावपट्टी दुरुस्तीच्या कारणास्तव हा बदल करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांची ये-जा अत्यंत कमी प्रमाणात झाली होती. डिसेंबर २०२१ पासून विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्याने उड्डाणांची संख्या वाढत होती. कोरोनापूर्वी दिवसाला १८० विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होत होते. या माध्यमातून दररोज २० ते २५ हजार प्रवासी प्रवास करत होते. गेल्या काही महिन्यांत दुबईसह बँकॉक, सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे. याशिवाय देशांतर्गत उड्डाणे देखील वाढल्याने लोहगाव विमानतळावर विमानांच्या संख्येसह प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच नाताळ, ३१ डिसेंबर आणि नववर्षानिमित्त या प्रवासी संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. यासह येत्या काळात नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील वाढण्याची शक्यता असल्याने भविष्यात १८६ पेक्षा अधिक विमानांचे टेकऑफ-लँडिंग होईल व प्रवासी संख्या देखील वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आलेली विमाने - ९३आलेले प्रवासी - १५ हजार १८०गेलेली विमाने - ९३गेलेले प्रवासी - १५ हजार ८७२