बारामती (पुणे) :बारामतीच्या युवकाने मागील महिन्यात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त चक्क दुचाकीवर ४ मिनिटे २० सेकंदांत १० सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला आहे. रोहित दिलीप शिंदे असे या धाडसी युवकाचे नाव आहे. त्याच्या या दुचाकीवरील सूर्यनमस्काराच्या विक्रमाची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.
चालू दुचाकीवर १० वेळा सूर्यनमस्कार काढणारा जगातील पहिला ‘मोटारसायकल रायडर’ ठरला आहे. तो वयाच्या १६ व्या वर्षापासून दुचाकी शर्यत करीत आलेला आहे. गेल्या १२ वर्षांपासून मोटारसायकल रायडिंग करून आतापर्यंत ३०० हून ‘मोटारसायकल रायडिंग शो’ भारतात केले आहे. मोटार सायकल रायडिंग करण्याचा छंद हा स्वत:पुरता मर्यादित राहिलेला नसून त्याने अनेक इच्छुक युवकांना मोटारसायकल रायडिंगचे प्रशिक्षण देण्यास सुरू केले आहे.
मोटारसायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडिंग ऑफ रोडिंग, ऑटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटारसायकल रायडिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नावलौकिक केला. त्यामध्ये देशातील ७० रायडरने भाग घेतला होता. ३९० सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणाऱ्या ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पर्धेसाठी रोहितची निवड झालेली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणाऱ्यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे, असे बजाज ऑटो लि.,चे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले आहे.
सन २०१८ मध्ये मोटारसायकल रायडिंगमध्ये रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला होता तर सन २०१९ मध्ये हैदराबादमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. यापूर्वी तामिळनाडू कोईमतूरमध्ये झालेल्या मोटारसायकल रायडिंगमध्ये वेगवेगळ्या तीन स्पर्धेमध्ये रेकॉर्ड करून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे याने देशात पहिला क्रमांक मिळविला होता. सीआरएफ कंपनीने स्टंट वॉलफेअर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये फ्री स्टाईल स्टंट रायडिंग ऑबस्टूकल टाइम चॅलेंज व लास्ट मॅन स्टँडिंग या तिन्ही स्पर्धांमध्ये रोहितने अव्वलस्थान पटकाविले होते. मोटारसायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची स्पर्धा होती. केवळ ८ मी. २८ सेकंद एवढ्या कालावधीत तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले होते. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट रायडिंगमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे.