लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घरेलू कामगार कल्याण मंडळाचे सन २०११ ते १४ दरम्यानचे हरवलेले दप्तर सापडले आहे. त्यामुळे त्यात नोंद असणाऱ्या महिलांना सरकारने जाहीर केलेली कोरोना निर्बंध मदत मिळेल.
सुमारे ६० हजार महिला कामगारांची नोंद सापडली असल्याचे समजते. त्या वेळी फक्त नाव, पत्ता नोंद करून घेण्यात आला होता. आधार कार्ड किंवा बँक खात्याच्या तपशिलाचा प्रश्नच नव्हता.
त्यामुळे आता या काळात मंडळात नोंद केलेल्या महिलांनी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन तिथे आपल्या आधार कार्डची तसेच बँक खाते क्रमाकांची नोंद करायची आहे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपये जमा केले जातील. त्या नोंदीमधील ज्या महिलांनी वयाची ६० वर्षे ओलांडली आहेत, त्यांना मात्र ही मदत मिळणार नाही. त्यांनाच खरी गरज असून वयाची ६० वर्षे झालेल्या महिलांनाही मदत द्यावी यासाठी घरेलू कामगार संघटना, आम आदमी पार्टी, कष्टकरी महिला संघटना या संस्थांचे पदाधिकारी सरकारकडे प्रयत्न करत आहेत.