खणलेल्या रस्त्यांची दुरूस्ती शास्त्रीय पध्दतीने केली नाही तर पावसाळ्यात रस्ते पुन्हा खड्ड्यात जातील. असे झाल्यास त्याचा खर्च अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी सजग नागरीक मंचाचा वतीने करण्यात आली आहे.
संपूर्ण पुणे शहर सध्या खड्ड्यात गेले आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या कामांमुळे संपुर्ण शहरात रस्ते खोदाई करण्यात आली आहे. यामुळे रस्ते लहान झाल्याने अनेक ठिकाणीं वाहतूक कोंडी देखील होते आहे. त्यातच सध्या पाऊस सुरू असल्याने चिखल, राडारोडा आणि खड्डे यातून सर्वसामान्य लोकांना वाट काढावी लागत आहे. याच परिस्थितीचा पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने स्वतःचा आदेशाला नी नियमावलीला केराची टोपली का दाखवली असा सवाल सजग नागरीक मंचाचा विवेक वेलणकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना पत्र लिहून विचारला आहे.
वेलणकर म्हणाले "चार वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी निवृत्त सार्वजनिक बांधकाम सचिवांच्या अध्यक्षतेखाली महापालिका करत असलेली रस्त्यांची कामे शास्त्रशुध्द पध्दतीने होण्यासाठी नियमावली बनवण्यासाठी समिती बनवली होती . मी त्याचा एक सदस्य होतो. तत्कालीन महापालिका रस्ते विभाग प्रमुखांसह आम्ही सर्वांनी एक रूपयाही मानधन न घेता भरपूर वेळ खर्च करून ही नियमावली बनवली , मात्र आत्ता सुरु असलेली रस्त्यांची कामे बघता ही नियमावली रद्दीत घातली असावी असे वाटते. रस्ते खोदताना तिथे कामाची मुदत , कामाचे स्वरूप , कंत्राटदाराचे नाव यांसारख्या माहितीचा फलक असलाच पाहिजे हा नियम असो की रस्त्याच्या खणलेल्या भागाभोवती सुरक्षेच्या दृष्टीने बॅरीकेडस् लावण्याचा नियम असो ते नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले आहेत. वाहतुकीला कमीत कमी अडथळा यावा या दृष्टीने रस्ता खोदताना पूर्ण रस्ता एकदम न खोदता थोडा भाग खोदावा , तेथील काम पूर्ण करून तो रस्ता शास्त्रीय पध्दतीने दुरूस्ती करून मग पुढील काम सुरू करावे याचा तर पूर्णपणे विसर पडल्याने आज शहरभर खोदकामांमुळे वाहतुकीची दुर्दशा झाली आहे."
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वळीव सुरु होतो हा अनेक वर्षांचा इतिहास असल्याने १५-२० मे पर्यंत रस्ता दुरुस्तीची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना यावेळी तो पर्यंत रस्ते खणण्याची कामेच सुरु होती. कामे करताना सुध्दा वाहतूक कोंडी होईल , लोकांना त्रास होईल याचा विचारही न करता शेजारच्या शेजारच्या रस्त्यांवर एकाच वेळी कामे सुरू करण्यात आली आणी ती अनेक दिवस रेंगाळली. आता पाऊस सुरु झाल्याने या रस्ते खोदाई मुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे , अपघात होऊ लागले आहेत , त्यामुळे घाईघाईने अशास्त्रीय पध्दतीने रस्ते दुरुस्ती ची कामे करायला सुरुवात झाली आहे. "आमच्या समितीने रस्ते दुरुस्ती करताना रस्ते दुरुस्ती नंतर त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेऊन कशी कामे करावीत याची जी नियमावली केली आहे त्याचे पालन झाले नाही तर परत पावसाळ्यात आज केली जाणारी रस्ते दुरुस्ती निकामी होऊन रस्ते शब्दशः खड्ड्यात जाण्याचा मोठा धोका आहे , मग त्यावेळी परत एकदा नागरीकांच्या करांचे पैसे खड्ड्यात घालून तात्पुरती मलमपट्टी करण्याची वेळ येईल. आपणास विनंती आहे की आपण रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्ती ची कामे शास्त्रीय पध्दतीने करण्याचे आदेश द्यावेत व जर पावसाळ्यात ही कामे उखडली गेली तर तेंव्हा परत कराव्या लागणाऱ्या दुरूस्ती चा खर्च संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून वसूल करण्यात येईल असे नमूद करावे." अशी मागणी वेलणकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.