शिक्रापूर : सध्या अनेक ठिकाणी प्रामाणिकपणा नाहीसा होत चालला असून, एखादी वस्तू सापडल्यास ती स्वत:कडे ठेवण्याकडे माणूस जास्त लक्ष देत आहे. अनेकांचे मोबाईल हरवल्यानंतर माणूस तो सापडण्याची आशा सोडून देतो. परंतु करंदी येथील कामकर दाम्पत्याला सापडलेला मोबाईल त्यांनी प्रामाणिकपणे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आणून दिला आहे.नोबल पोल्ट्री येथे काम करणारे दाम्पत्य संतोष कचरू कामकर, मंगल संतोष कामकर हे त्यांच्या अजिंक्य या मुलासह रविवारी सकाळी शिक्रापूर येथील आठवडे बाजारात येत असताना रस्त्यात त्यांना एक मोबाईल सापडला. एखाद्या व्यक्तीला स्क्रीनटच मोबाईल सापडला तर तो खूप खुश होतो. परंतु काटकर दाम्पत्याला मोबाईल सापडल्यानंतर, हा मोबाईल कोणाचा हरवला असेल, तो माणूस किती नाराज असेल असे बोलून त्यांनी शिक्रापूर येथे येऊन पोलीस स्टेशन गाठले. सापडलेला मोबाईल सांगत शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिला. या वेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार असलेले अनिल कोळेकर, पुनाजी जाधव, सीमा गवारी यांनी कामकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले. असा प्रामाणिकपणा क्वचितच पाहावयास मिळत असल्याचे पुनाजी जाधव यांनी सांगितले. कामकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना पोलीस नाईक अनिल कोळेकर व पुनाजी जाधव हे बक्षीस देत असताना कामकर यांनी ते बक्षीस नाकारले. त्यानंतर सदर मोबाईलवर आलेले फोनवरून मालकाचा शोध घेतला असता तो मोबाईल केंदूर येथील रामदास थिटे यांचा असल्याचे निदर्शनास आले. यांनतर शिक्रापूर पोलिसांनी मोबाईल मालकास बोलावून त्याच्या ताब्यात मोबाईल देण्यात आला.(वार्ताहर)
सापडलेला मोबाईल दाम्पत्याने केला परत
By admin | Published: April 10, 2017 1:44 AM