पुणे : वर्षानुवर्षांच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी पालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ही योजना सुरू झाल्यापासून फक्त १० दिवसांत पालिकेची तब्बल २५ कोटी ८५ लाख रुपयांची वसुली काहीही न करता झाली आहे. आजच्या एकाच दिवसात पालिकेच्या तिजोरीत ४ कोटी रुपये पडले. दोन महिन्यांची मुदत असलेल्या या योजनेत साधारण २५० कोटी रुपये तरी वसूल व्हावेत, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. पालिकेच्या सर्व कर वसुली केंद्रावर योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, कर्मचाऱ्यांना आकडेवारी तसेच सवलतीविषयी थकबाकीदाराला व्यवस्थित माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मिळकतकर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले. योजनेचा अधिक प्रचार व्हावा यासाठी शहरात सर्वत्र माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत, तसेच अन्य प्रसिद्धी माध्यमांचाही उपयोग करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त थकबाकीदारांपर्यंत ही योजना पोहोचावी व त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा, यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मापारी यांनी दिली. सुरुवातीच्या आठवड्यातील प्रतिसाद चांगला असून, तो आता वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मिळकतकर अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या मिळकतधारकांची संख्या २ लाख ७३ हजार इतकी आहे. त्यांनी थकवलेला मिळकतकर ५२० कोटी रूपये आहे. त्यावरचा दंड ५१५ कोटी रूपये आहे. पालिकेचे मिळकत करापोटी असे एकूण १ हजार ३५ कोटी रूपये अनेक वर्षे थकले होते. ते वसूल करण्यासाठी दंडामध्ये सवलत देणारी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात १० फेब्रुवारीपर्यंत थकबाकी देणाऱ्याला दंडात ७५ टक्के तर त्यानंतर ११ मार्चपर्यंत पैसे जमा करणाऱ्यांना दंडात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. दुबार आकारणी, न्यायालयीन प्रकरण, चुकीची आकारणी अशा कोणत्याही कारणे मिळकतकर थकीत ठेवला असेल तर संबंधित मिळकतधारकांनी पालिकेतील कर विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या शंकांचे निराकरण करून योजनेचा लाभ त्यांना देण्यात येईल, अशी माहिती मापारी यांनी दिली. (प्रतिनिधी)
दहा दिवसांत २६ कोटींची वसुली
By admin | Published: January 21, 2016 1:24 AM