चाकण : येथील औद्योगिक वसाहतीमधील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून वासुली फाटा अल्पावधीत उदयास येत असतानाच या भागात अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. औद्योगिक भागासाठी महाळुंगे पोलीस चौकी सुरू करण्यात आली असली तरी खंडणी, हप्तेखोरी, कामगारांची लूटमार, अवैध धंदे आणि गुन्हेगारी वृत्तीने वासुली फाट्याचा वसुली फाटा होत असल्याचे नुकत्याच काही घडलेल्या घटनांवरून समोर आले आहे. त्यामुळे या सर्वांवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमधील वासुली फाटा या मध्यवर्ती भागात मोठी बाजारपेठ उदयास येत आहे. येथील लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून अगदी २०० रुपयांपासून ते २५-३० हजार रुपयापर्यंत दरमहा हप्ता वसूल केला जात आहे. व्यावसायिकांना धमाकावून हप्ता मागितला जात आहे. आणि जर दिला नाही तर मारहाण करून हप्ते वसुली केली जात आहे. आजपर्यंत घडलेल्या जीवघेण्या घटनांवरून हे समोर आले आहे. कंपन्यांमध्ये ठेके घेण्यावरून होत असलेले वादविवाद, त्यात होत असलेला हस्तक्षेप, भावकीच्या, गावकीच्या भांडणात बाहेरील गुंडांना बोलावणे, स्थानिक म्हणून पूर्वी दिलेले ठेके नव्याने देताना गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी केलेला हस्तक्षेप अशा घटना या भागात वारंवार घडत आहे. ओठावर मिसरूड न फुटलेल्या मुलांमध्ये भाईगिरीचे प्रचंड आकर्षण निर्माण झाल्याने गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे.
या परिसरात सध्या काही युवक टोळक्याने राहून आपला दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. हफ्ते वसुली, अवैध दारू विक्री, हातभट्टी दारू निर्मिती, रात्रीच्या वेळी कामगारांना लुटणे, लहान-मोठ्या चोऱ्या करणे, गाड्यांमधील पेट्रोल चोरणे अशा अनेक घटना या भागात घडत आहे. या भागात डोके वर काढत असलेली गुन्हेगारी वृत्ती जागीच ठेचली नाही तर भविष्यात वासुली फाटा हे गुन्हेगार निर्मितीचे केंद्र ठरल्याशिवाय राहणार नाही.
चाकण आणि महाळुंगे येथील बाजारपेठांनंतर अल्पावधीतच उदयास आलेली आणि या बाजारपेठांना समांतर असणारी बाजारपेठ म्हणून वासुली फाटा पुढे येत आहे. परंतु सध्या या भागाला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. या भागात वाढत असलेली गुन्हेगारी पाहता पोलिसांनी कणखर भूमिका घेणे अपेक्षित आहे. बेभान झालेले काही तरुण स्वतःच्या घरच्यांना देखील जुमानत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अशी भावना या भागातील नागरिक,व्यावसायिक आणि चक्क अशा तरुणांचे पालकदेखील बोलत आहेत.
तरुणांची पावले भाईगिरीकडे
एमआयडीसीमुळे येथील जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे. गुंठाभर जागा विकली तरी लाखो रुपये मिळत असल्याने येथील युवक चंगळवादी बनत चालली आहे. तालुक्यातील दिवसागणिक येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे युवकांच्या खिश्यात पैसा खुळखुळू लागला आहे. विना कष्टात मुबलक पैसे मिळत असल्याने युवकांमध्ये चंगळवादी वृत्ती वाढीस लागल्याने तरुणांची पावले भाईगिरीकडे वळू लागली आहेत. औद्योगिक वसाहतीमधील गावांमध्ये युवकांचे दोन वर्ग पाहायला मिळत आहे. एक म्हणजे प्रकल्पबाधित तरुण मिळालेल्या पैशातून उद्योग व्यवसाय करून स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडत आहेत.