अभिजित कोळपे
पुणे : राज्यातील जलसंपदा विभागातील क्षेत्रीय स्तरावरील कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ (अराजपत्रित) या संवर्गातील ५०० पदे सरळसेवेने भरण्यासाठी जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, मागील अडीच वर्षांत याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. राज्यात ५७ हजार विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. जलसंपदा मंत्री जयंती पाटील आणि राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांना भेटून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यातील वाढती बेरोजगारी हा सध्या ऐरणीचा प्रश्न आहे. अनेक तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत. जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. जुलै २०१९ मध्ये ही जाहिरात प्रकाशित झाली असून १५ ऑगस्ट २०१९ रोजी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत होती. ५७ हजार तरुणांनी यासाठी अर्ज केले आहेत. पण जवळपास अडीच वर्षे पूर्ण झाले असून देखील अद्याप या पदाची परीक्षा झालेली नाही.
राज्यस्तरीय समितीची पुन्हा पुर्नरचना
राज्य शासनाने या परीक्षेसंदर्भात राज्यस्तरीय समितीची ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पुर्नरचना केली आहे. यामध्ये हनुमंत गुणाले हे अध्यक्ष, तर सदस्य म्हणून हनुमंत धुमाळ, जयंत बोरकर, विजय घोगरे, अभय पाठक, डॉ. संजय बेलसरे, इलियास मोहमद पाशा चिस्ती, स. चं. बोधेकर आणि बा. ज. गाडे आदी जलसंपदा विभागातील वेगवेगळ्या पदांवरील ९ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता ही समिती परीक्षेसंदर्भात नियोजन करणार आहे.
विधी व न्याय विभागाचा अहवाल आल्यास लगेच परीक्षा घेऊ
समितीचे अध्यक्ष हनुमंत गुणाले यांची युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन तातडीने प्रलंबित पद भरती पूर्ण करण्याची मागणी केली. तेव्हा हनुमंत गुणाले म्हणाले, की हे प्रकरण न्यायाल्याने दिलेल्या अरक्षणाबाबतच्या निकालानंतर विधी व न्याय विभागाकडे पाठवले आहे. संबंधित विभागाचा अहवाल येताच तातडीने परीक्षा घेऊ, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.