सुषमा नेहरकर-शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होणार म्हटल्यावर गावकारभाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन गावांमध्ये बोगस नोकरभरती केली आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या तेवीसपैकी तेरा गावांमध्ये हे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. नोकर भरतीचे सहा महिन्यांपासून दीड वर्षांपर्यंतचे बोगस रेकॉर्ड तयार केले आहे. या सर्व बोगस नोकर भरती प्रकरणात तब्बल ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. या बोगस कर्मचाऱ्यांची नोंदणी तर रद्द होईलच, त्यासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी होणार आहे.
हवेली आणि मुळशी तालुक्यांतील तेवीस गावे महापालिका हद्दीत आली. मात्र याची चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच काही गावकारभाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून मोठ्या प्रमाणात बोगस नोकरभरती केली. या संदर्भात काही ग्रामपंचायतींच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषदेने सर्वच तेवीस गावांतल्या नोकरभरतीच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीकडून तपासणी सुरू असून प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत.
चौकट
नऱ्हात सर्वाधिक भरती
तेवीसपैकी तेरा गावांमध्ये सर्वाधिक बोगस भरती झाली आहे. एकट्या नऱ्हे ग्रामपंचायतीने तब्बल सव्वाशे कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आले आहे. याशिवाय म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, वाघोली, होळकरवाडी, मांजरी (बु.) या ग्रामपंचायतींमध्येही बोगस नोकरभरती झाल्याचे दिसत आहे.
चौकट
बिनपगारी काम
महापालिकेत नोकरी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी लाखो रुपये देऊन ग्रामपंचायतीत नोकरी मिळावली. यात ग्रामपंचायतीमधल्या कारभाऱ्यांनी पैसे घेऊन त्यांना रुजू करुन घेतल्याचे सांगितले जाते. महापालिकेतल्या नोकरीच्या आशेपायी अनेकांनी अनेक ग्रामपंचायतींत कोणतेही मानधन, पगाराची अपेक्षा न ठेवता कामास तयार असल्याचे लेखी दिले आहे.
चौकट
लग्नासाठी सर्व उठाठेव
महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायतीत अनेक प्रतिष्ठित व सधन घरातील मुलांनी चक्क शिपाई, सफाई कामगार, क्लार्क अशा पदांच्या नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये दिले आहेत. याचे मुख्य कारण ‘लग्न’ असल्याचे सांगितले जाते. “मुलगा महापालिकेत नोकरीला आहे,” हे सांगितल्यावर चांगल्या घरची, शिकलेली मुलगी मिळेल या अपेक्षेने या नोकऱ्या स्वीकारल्या आहेत.