पुणे : राज्यातील वाढत्या बेरोजगारीने तरुणांचे एकूण मनोबल खचले आहे. असंख्य तरुण आत्महत्येसारखा विदारक पर्याय अवलंबत आहेत. असे असताना प्रशासन मात्र दोन वर्षे जुनी पदभरती पूर्ण करण्यास सक्षम नाही, ही बाब निंदनीय आहे. लेखा व कोषागार संचलनालयातील एकूण ९३२ रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया २०१९ मध्ये राबविण्यात आली. या पदभरतीमधील पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. हा पूर्णतः प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. त्यात आता कंत्राटी पदभरती करण्याचा घाट घातला जातोय आम्ही तो हणून पाडू, असा इशारा विद्यार्थी आणि विविध संघटनांनी दिला आहे.
लेखा व कोषागारमधील तीन विभागांसाठी ही भरती राबविण्यात आलेली होती. अमरावती, पुणे आणि कोकण या विभागांसाठी ही पद भरती राबविलेली आहे. यापैकी ८०% पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित केले आहेत. इतर उमेदवार मात्र पात्र असून देखील अद्याप बेरोजगार आहेत. त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचे कुठले ही अधिकार राज्यसरकार आणि प्रशासनास नाही आहेत. कागदपत्र पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणे बंधकारक आहे. पण सध्याच्या स्थितीत कोरोना प्रादुर्भाव, शासनाने ४ मे रोजी टाकलेले पदभरतीवरील निर्बंध अशा कारणाने ही पदभरती लांबणीवर राहिली, अशी माहिती विद्यार्थी शिवाजी इंगवले, आदिती भोसले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली.