पुणे : महापालिकेच्या विविध खात्यांमधील कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) च्या ३४७ रिक्त जागांसह आरोग्य विभाग, अग्निशामक विभाग आदी विभागांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.
ही भरतीप्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होणार असून, यामध्ये नव्याने समाविष्ट २३ गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ५ अग्निशमन केंद्रांमध्ये २०० फायरमन कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे़त, तर आरोग्य विभागातील भरती करताना, कोरोनाकाळात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासकपदी नियुक्त झाल्यावर दुसरी स्थायी समितीची बैठक मंगळवारी संपन्न झाली़ त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली़ बैठकीमध्ये महापालिकेने उभारलेली तीन रुग्णालये ठेकेदारी पद्धतीने चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याकरिता लवकरच निविदा काढून खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत़
३१ मार्चपर्यंत सर्व देयके अदा करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला होता़ त्यानुसार आत्तापर्यंत ४ हजार ३०० कोटी रुपयांची देयके दिली गेली आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करणे आवश्यक आहे. परंतु, वर्षाअखेर किती शिल्लक राहते त्यानुसारच हा फरक कधी व किती टप्प्यात द्यायचा याचा निर्णय होईल, असे कुमार यांनी सांगितले.
जायका प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याबाबत नियोजन
जायका प्रकल्प दोन वर्षांत म्हणजेच मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाचे ठेकेदार, सल्लागार व पालिकेच्या अंमलबजावणी यंत्रणेतील अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली़ यामध्ये पुढील तीन महिन्यांत जायका प्रकल्प अंमलबजावणीचा आराखडा तयार करून तो तीनऐवजी दोन वर्षांत पूर्ण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.