लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एसटी महामंडळाच्या पुणे जिल्ह्यातील चालकवाहकांच्या १ हजार ६४७ जागांवरील भरती प्रक्रिया रखडली आहे. उमेदवारांची लेखी परीक्षा झाली, वैद्यकीय चाचणीही घेण्यात आली, मात्र कोरोनाच्या अडथळ्यामुळे काही उमेदवारांची वैद्यकीय चाचणी झाली नाही व निवड यादीच लटकलेली आहे.
रखडलेल्या या यादीला आता कोरोना टाळेबंदी संपली तरी मुहूर्त मिळायला तयार नाही. पुणे विभागातील १ हजार ६४७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी साडेसहा हजार अर्ज प्राप्त झाले. पूर्वी चालक वाहक वेगवेगळे असायचे, पण या भरतीमध्ये मात्र चालक तथा वाहक असे एकत्रीकरण करण्यात आले. अर्ज केलेल्या सर्वांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यात ३ हजार ६०० उमेदवार पात्र ठरले. त्यांची वैद्यकीय चाचणी झाली. त्यात ३ हजार जण राहिले. त्या सर्वांची महामंडळाच्या भोसरी येथील कार्यशाळेत वाहन चालवण्याची चाचणी ठरवण्यात आली.
त्याप्रमाणे चाचणी सुरूही झाली. काही उमेदवारांची चाचणी झाली व कोरोनाची टाळेबंदी लागली. त्यामुळे ७०० उमेदवारांना ही चाचणी देताच आली नाही.
महामंडळाच्या नियमानुसार लेखी परीक्षा व ही चाचणी यांच्यातील गुण एकत्र करून त्यानंतर ज्यांचे गुण जास्ती या क्रमाने निवड यादी जाहीर केली जाते. मात्र ७०० जण चाचणी देण्यापासून राहिल्यामुळे ही यादी तयारच झाली नाही. अजूनही या ७०० उमेदवारांची चाचणी झालेली नाही. त्यामुळे लेखी परीक्षा व चाचणी दिलेले उमेदवारही नोकरी मिळण्यापासून रखडले आहेत, तर चाचणी झाली नाही अशा उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जाण्याची प्रतीक्षा आहे, पण तसेही व्हायला तयार नाही.
------------------
वरिष्ठांकडून या विषयात मार्गदर्शन मागवले आहे. महामंडळाच्याच कार्यशाळेतील अधिकाऱ्यांकडून चाचणी घेतली जाते. काही उमेदवार शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे यादी जाहीर करता येत नाही. त्यांची चाचणी झाली की लगेचच गुणवत्तेनुसार निवडयादी जाहीर होईल.-
धनंजय शिवदास- विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी
--------------------
जिल्ह्यातील जागा- १ हजार ६४७
प्राप्त अर्ज- ६ हजार ५००
लेखी परीक्षेनंतर शिल्लक उमेदवार- ३ हजार ६००
वैद्यकीय चाचणीनंतर शिल्लक उमेदवार- ३ हजार
वाहन चालवण्याची चाचणी झाली- फक्त २ हजार ३००
शिल्लक राहिलेले उमेदवार- ७००