लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांसाठी लष्करातर्फे भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर १२ ते १४ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील युवा महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देश्याने ही भरती घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील इच्छुक महिला उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in. संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. १० वी उत्तीर्ण महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज केल्यावर उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर ओळखपत्र पाठवण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज भरताना भरतीकरिता आवश्यक मुद्दे पाहून काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झाले आहे. अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे. शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना बायोमेट्रिक पद्धतीने तपासून तसेच त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करून त्यांना भरती ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लष्करी पोलीस दलात दाखल करून घेतले जाणार आहे.
चौकट
कोरोनाची नियमावली पाळून होणार भरती प्रक्रिया
कोरोनाची सर्व नियमावली पाळून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी मैदानावर सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टिकोनातून लष्करातर्फे सर्व काळजी घेतली जाणार आहे. उमेदवारांनी येताना आवश्यक कागदपत्रांची खरी प्रत, ओळखपत्र, तसेच झेरॉक्स आणि प्रतिज्ञापत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.