पुणे: मार्केटयार्ड परिसरातील पदपथांवर उभारण्यात आलेल्या होर्डिंगला पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने नोटीस बजावली असून, या होर्डिंगची दुरूस्ती करावी अन्यथा त्यांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
राज्य सरकारने आकाशचिन्ह विभागासाठी तयार केलेल्या नियमावलीमध्ये पदपथावर आणि सार्वजनिक रस्त्यावर कोणताही जाहिरात फलक लावता येणार नाही. जेथे पदपथ नसेल तेथेही सार्वजनिक रस्त्यावर जाहिरात फलक लावता येणार नाही अशी तरतूद आहे. मात्र, या नियमाचे उल्लंघन करून मार्केटयार्ड परिसरात होर्डिंग उभा करण्याची परवानगी दिली गेली आहे. येथील शिवनेरी रस्त्यावर बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच किराणा भुसार मालाच्या बाजाराच्या प्रमुख रस्त्यांलगत हे होर्डिंग उभे आहेत. याविषयी माध्यमांमध्ये बातम्या आल्यावर, आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील आकाशचिन्ह निरीक्षकांना पाहणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या पाहणीत सदर होर्डिंग हे नियम धाब्यावर बसवून उभे केल्याचे आढळून आले. हे होर्डिंग हे मान्य आकारापेक्षा जास्त आकाराचे आहेत. तसेच या होर्डिंगच्या सांगाड्याला गंजराेधक रंग लावला नसल्याचे दिसून आले आहे. या दोन कारणांमुळे होर्डिंगधारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या त्रुटी एका दिवसात दूर करा अन्यथा त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.