पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात शनिवारपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत गगनबावडा १२०, लोणावळा, महाबळेश्वर ८०, इगतपुरी, ओजरखेडा, राधानगरी ५०, बरसी, राहुरी, सांगोला ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. घाटमथ्यावरील डुंगरवाडी १००, लोणावळा, भिरा ९०, दावडी, कोयना (पोफळी), खोपोली ७० मिमी पाऊस झाला होता.
रविवारी दिवसभरात पुणे १०, महाबळेश्वर २६, नाशिक ३, सातारा १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.