पुणे : राज्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गुरूवारी (दि.१८) आणि शुक्रवारी (दि.१९) मेघगर्जनेहस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना मात्र रेड अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे.
राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे. आज गुरूवारी नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर उद्या शुक्रवारी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उद्या शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये आज व उद्या दोन दिवस रेड अलर्ट आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर देखील चांगला पाऊस होत आहे. राज्यातील धरणांत बऱ्यापैकी पाणीसाठा होत आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस होत असून, पूर्व भागात मात्र अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने भातलागवडही सुरू झाली आहे.
पुढील तीन तासांमध्ये राज्यातील ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.- डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ