पिंपरी : पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी आपल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांना गाडीवरील दिवा काढण्याचा सोस काही आवरत नसल्याचे दिसून येत आहे.पक्षनेते एकनाथ पवार यांनी सर्वप्रथम महापालिकेचे वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी महापालिकेचे वाहन नाकारले. जनतेच्या पैशांची बचत व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. तसेच पत्रकारांना स्थायी समितीच्या बैठकीस बसण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, महापौरांनी शासकीयच वाहन वापरणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. दरम्यान, जनता आणि सरकार यांच्यातील अंतर कमी व्हावे यासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल दिवा हटविला. त्यानंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी लाल दिवा काढला. (प्रतिनिधी)
लाल दिव्याचा महापौरांना सोस
By admin | Published: April 21, 2017 5:56 AM