पुणे : ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही केवळ वास्तू नाही तर ही भारताची संस्कृती आहे. ती त्याच रूपात जतन झाली पाहिजे. मात्र आपल्याकडे एखादी गोष्ट जतन करण्याची संकल्पना हा संवेदनशीलतेचा भागच राहिलेला नाही. आपल्याला जतन करण्याची सवय नाही म्हणूनच इतिहास हेलकावे खातो आहे आणि आपल्याला हवा तसा इतिहास लिहिला जातोय. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर संपूर्ण किल्लाच नेस्तनाबूत करणार का? असा सवाल ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी उपस्थित केला.बालगंधर्व रंगमंदिरामधील त्रुटींचा डागडुजी,दुरूस्ती वगैरेच्या दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. बालगंधर्व रंगमदिराच्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सचिन बालगुडे पाटील, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, मुरलीधर निंबाळकर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ संगीत संयोजक आणि अकॉर्डियन वादक इनॉक डँनियल यांना बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालगन्धर्व व्यवस्थापक सुनील मते, विनोद वैरागत, श्यामसुंदर कणके, जीएसटी सहायक आयुक्त अनिल खरात, अँड अतुल गुंजाळ, वसंतराव म्हसके यांना बालगंधर्व गौरव पुरस्कार तर मुकुंद संगोराम यांना बालगंधर्व विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौरांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकासाचा मुद्यावर केंद्रे यांनी केले. ते म्हणाले, जर्मन, इंग्लडच्या लोकांची यात्रा शेक्सपिअर थिएटरला भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. ब्रिटीशानी वर्ल्ड थिएटर जतन केले आहे. मात्र आपल्याकडे जतन करण्याची संकल्पना हा संवेदनेचा भागच राहिलेला नाही.देश महासत्ता कधी होतो.जेव्हा संस्कृती जतन केली जाते ती जपली नाही तर अडाणी समाज म्हणून आपण गणले जाणार आहोत. बालगंधर्व रंगमंदिराच्या डिझाईनला भारतात तोड नाही. इथे प्रेक्षकांसाठी सोयी उपलब्ध आहेत. थिएटर असते तेव्हा समृद्धी असते. मुंबईतील छबिलदास नाट्यगृहाने आधुनिक रंगभूमीचा पाया रचला. पण ते नष्ट झाल्यानंतर समांतर, व्यावसायिक रंगभूमीची परवड झाली. मराठी एकमेव समाज थिएटरला मंदिर मानतो. त्यांचा दृष्टीकोन रंगमंदिर केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर ते जगण्याचे भान देतात. पण आज या मंदिराची अवस्था पाहिली की वाईट वाटते. त्याचा सन्मान राखला जायला हवा. शासनात सांस्कृतिक संवेदनशील व्यक्ती असतीलच असे नाही. कलावंत-रसिकांनी सावध राहिले पाहिजे. यावेळी इनॉक डँनियल आणि मेघराज राजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केलेचौकट वल्गना निरर्थक मुक्ता टिळक यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकासावर भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, बालगंधर्व पुर्नविकास करण्याचा विषय आला तेव्हा अनेकांनी टीका केली. मात्र कलेला नष्ट करण्याचा कोणताही विचार नाही. पण वाहनांची संख्या वाढत आहे. रोज अनेक कार्यक्रम इथे होत आहेत. त्यामुळे जुने मंदिर न पाडता अतिरिक्त गोष्टी करण्यावर भर दिला जाणार आहे. एक तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्याशी चर्चा करून डिझाईन मान्य केले जाणार आहे. त्याप्रमाणे तांत्रिक, कला, लोकांच्या भावना या दृष्टीकोनातून विचार केला जाईल. बालगंधर्व नामशेष होईल या वलग्नांना काहीही अर्थ नाही.
बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:34 PM
‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही केवळ वास्तू नाही तर ही भारताची संस्कृती आहे. ती त्याच रूपात जतन झाली पाहिजे..
ठळक मुद्दे‘बालगंधर्व’च्या पुर्नविकासावर वामन केंद्रेंचा सवालआपल्याला जतन करण्याची सवय नाही म्हणूनच इतिहास हेलकावे खातो आहे