पुणे : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’चे वेध प्रेमी युगलांना लागले आहे. त्यामुळे लाल गुलाबांना मागणी वाढली असून फुलांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्यता गुलाब व्यापा-यांनी व्यक्त केली. रविवार- सोमवारी घाऊक बाजारात फुलांच्या २० नगास १६० ते १८० रुपये दर मिळत असल्याची माहिती अखिल फूलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर आणि प्रसिध्दी प्रमुख सागर भोसले यांनी दिली. ‘व्हॅलेनटाईन डे’ला प्रेमाच्या आणाभाका घेत गुलाब देण्याची प्रथा आहे. याबाबत वीर यांनी सांगितले, मावळ आणि शिरूर तालुक्यातून येथील मार्केट यार्डातील फुल बाजारात गुलाबांची जास्त आवक होत आहे. येथून राज्यात नागपूर, गुजरातमध्ये सुरत, बडोदा, मध्यप्रदेश येथील इंदौर, तेलगंणा येथील हैदराबाद, दिल्ली येथे फुलांची निर्यात होत आहे. व्हॅलेनटाईन डे ला आणखी चार दिवस असल्याने शेतक-यांनी माल राखून ठेवला आहे. येत्या दोन दिवसात आणखी आवक वाढेल. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील रविवारी गुलाबास १२० ते १४० रुपये दर मिळाला होता. तो आज वाढला आहे. गेल्या वर्षी साधारणपणे २०० रुपये दर मिळत होता. सोशल मीडियाच्या जमान्यात इमेज तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याची प्रथा वाढते आहे. याचा फटका गुलाब शेतीला बसू लागला आहे. गुलाबाच्या मागणीत अपेक्षेइतकी वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे जास्त निगा राखावी लागत असलेल्या गुलाबाची लागवड कमी प्रमाणात केली जात आहे. सरासरीच्या तुलनेत ७० टक्केच लागवड केली जाते. भोसले म्हणाले, की पांढºया, पिवळ्या आणि इतर रंगाच्या फुलांनाही मागणी आहे. या फुलांना लाल गुलाबापेक्षा जास्त म्हणजे २० नगांना २०० रुपये दर मिळाले.
‘व्हॅलेनटाईन डे’मुळे वाढली गुलाबाची लाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 7:33 PM
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’चे वेध प्रेमी युगलांना लागले आहे.
ठळक मुद्देआवक आणि दरामध्ये ४० टक्क्यांनी वाढ