राजानंद मोरे ल्ल पुणेपीएमपीएमएल प्रशासन प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असताना, दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र दिसत नाही. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस उपाययोजना करीत आहेत. दुचाकी, चारचाकीचालकांनी सिग्नल तोडल्यास, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केल्यास कारवाई होते. या कारवाईतून पीएमपी वगळण्यात आली आहे का? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने प्रमुख रस्त्यांवर पीएमपी गाड्यांची पाहणी केली असता, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे असे प्रकार पाहायला मिळाले.४इतर वाहनचालकांप्रमाणेच अनेक बसचालकही नियमांकडे दुर्लक्ष करून आपल्याच धुंदीत बस चालवितात. काही चालक मात्र वाहतुकीचे नियम पाळताना आढळून आले. काही चालकांनी झेब्रा क्रॉसिंगवर बस उभी करण्याचे टाळले. या बसला पाहून इतर वाहन चालकांनीही मग झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करण्याचे टाळले. ४पीएमपीने एक योजना जाहीर केली होती. त्याप्रमाणे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाचे छायाचित्र काढून प्रशासनाकडे पाठविल्यास एक हजार रुपयांचे बक्षीस छायाचित्र काढणाऱ्यास दिले जाते. त्यानुसार डिसेंबर २०१३ पासून मार्च २०१५ पर्यंत १४ चालकांचे मोबाईलवर बोलतानाचे छायाचित्र नागरिकांनी काढले होते. त्याचप्रमाणे झेब्रा क्रॉसिंंगवर गाडी उभी करणे, सिग्नल तोडणाऱ्या बसचे छायाचित्र पाठविणाऱ्यालाही बक्षीस देण्याची योजना होती. मात्र, या योजनेला प्रतिसाद न मिळाल्याने झेब्रा क्रॉसिंगवरील योजना बंद करण्यात आली आहे. या योजनांमुळे चालकांवर काही प्रमाणात अंकुश होता; मात्र ही योजना बंद झाल्याने चालक बिनधास्त असल्याचे दिसते.वेळ - दुपारी २.४० ते ३.१०, ठिकाण - मनपा बस स्थानकाशेजारील चौक... अर्ध्या तासात या वेळेत काँग्रेस भवनकडून बसस्थानकाकडे ५५ बस गेल्या. यापैकी तब्बल ३३ बसचालकांनी सिग्नल तोडला, तर जंगलीमहाराज रस्त्याकडे जाणाऱ्या ३५ बसेसपैकी १२ बस सिग्नलवर लाल दिवा लागलेला असतानाही सुसाट निघून गेल्या. बससेवा सुधारण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) विविध उपाययोजना केल्या जात असताना बसचालक मात्र त्याला ‘रेड सिग्नल’ दाखवीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळले.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने दुपारी २.४० ते ३.१० या अर्धा तासाच्या वेळेत मनपा बसस्थानकाजवळील चौकातून जाणाऱ्या बसची पाहणी केली. या वेळेत काँग्रेस भवनकडून स्थानकाकडे ५५ बस गेल्या. त्यापैकी ३३ बसचालकांनी रेड सिग्नलकडे काणाडोळा केल्याचे दिसून आले, तर त्याच चौकातून जंगलीमहाराज रस्त्याकडे जाणाऱ्या ३५ बसपैकी १२ बसचालकांनी सिग्नल तोडला. याचप्रकारे टिळक रस्ता व शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या बसचीही पाहणी केली. स्वारगेट येथील मुख्य चौकाच्या अलीकडे टिळक रस्ता व शिवाजी रस्ता एकत्र येत असलेल्या चौकात प्रतिनिधीने ५.४५ ते ६.१५ या वेळेत पाहणी केली. टिळक रस्त्याने आलेल्या ३९ बसपैकी १५ तर शिवाजी रस्त्याने आलेल्या ४२ बसपैकी १७ बसचालकांनी सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज सुमारे १६५० बसच्या हजारो फेऱ्या होतात. अनेक बस सततच्या वर्दळीच्या मार्गावरून धावतात. मागील चार महिन्यांपासून पीएमपीची सेवा अधिक सक्षम करणे, चालक-वाहक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना कामात शिस्त लावण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर केवळ साडेतीन महिने राहिलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांनी चालक-वाहकांसह सर्व कर्मचाऱ्यांसाठीच एक नियमावली तयार केली आहे. बस चालविताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात या बाबींचा नियमावलीत समावेश केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक चालकांकडून या नियमावलीला केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र शहरातील बहुतेक रस्त्यांवर दिसत आहे.